Pune : सभापती दिलीप काळभोर यांचा राजीनामा; पुणे बाजार समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीसह भाजपाही इच्छुक

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी सोमवारी (दि. ७) राजीनामा दिला आहे. ९ मे २०२३ रोजी ते सभापती झाले होते. मागील काही दिवसांत बाजार समितीत गैरकारभार सुरू असल्याची चर्चा होती. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे समिती बरखास्तीची मागणी केली होती. वडगावशेरीचे आमदार बापू पठारे यांनीही बाजार समितीविषयी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
२०२३ मध्ये तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनीही संचालक मंडळाच्या कारभाराच्या चौकशी आदेश दिले होते. ती चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. यापूर्वी सभापतींवर एकदा अविश्वासाचा ठरावही आणला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता. दरम्यान, माजी सभापती ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, संचालक राजाराम कांचन आणि संचालक रामकृष्ण सातव यांच्या नावाची सभापतिपदासाठी चर्चा आहे. कोणाच्या गळ्यात सभापतीची माळ पडणार, याची चर्चा बाजार घटकात आहे.
बाजार समितीवर २० वर्षे प्रशासक होते. त्यानंतर २५ महिन्यांपूर्वी निवडणूक झाल्यापासून काळभोर सभापती होते. त्यांनी जिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे राजीनामा दिला. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, माजी सभापती ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संधी कोणाला?
बाजार समितीवर विजयी झालेले संचालक मंडळ राष्ट्रवादी, भाजपसह विविध पक्षांचे आहे. सभापती काळभोर हे राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे होते. त्यामुळे पुढचा सभापती भाजपचा होणार की राष्ट्र्वादीचा, याबाबत बाजारात उत्सुकता आहे.
सभापतिपदाच्या कार्यकाळात बाजार समितीचे उत्पन्न वाढले. बाजार विकासाची कामे सर्व संचालक, तसेच बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे पूर्ण करू शकलो. – दिलीप काळभोर, मावळते सभापती, पुणे बाजार समिती





