Pune : जगताप, हौसारेंची नियुक्ती रद्द करा; बाजार समिती चौकशीबाबत शरद पवार गटाची पणनमंत्र्यांकडे मागणी

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशी समितीत प्राधिकृत अधिकारी म्हणून उपनिबंधक प्रकाश जगताप आणि दिगंबर हौसारे यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे. हे दोघेही संचालक मंडळाच्या सतत संपर्कात असल्याने त्यांच्याकडून पारदर्शक चौकशी होणार नाही. त्यामुळे नियुक्ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बाजार समितीची ५१ मुद्द्यांवर चौकशीचे आदेश पणन संचालकांनी दिले आहे. पाच जणांच्या समितीत वरील दोघांचा समावेश आहे. आपल्या मागणीचे पत्र लवांडे यांनी पणनमंत्री जयकुमार रावळ यांना दिले आहे. पत्राती प्रत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन संचालक विकास रसाळ यांना पाठविली आहे.
लवांडे यांनी पत्रात म्हटले आहे की, गेल्या वर्षात पणन संचालकांनी विविध तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे संचालकांना अभय मिळाले आहे. जगताप, हौसारे यांचा चौकशीतील हेतू साफ नसल्याने त्यांची नियुक्ती रद्द करावी. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आणि दिगंबर हौसारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
निवडणूक पुढे ढकलावी
बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक १८ जुलैला होणार आहे. चौकशी होईपर्यंत निवड पुढे ढकलावी. चौकशी समितीच्या कामकाजावर संचालक मंडळ दबाव टाकू शकते. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी लवांडे यांनी केली आहे़





