Pune Book Festival : यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव 13 ते 21 डिसेंबरला होणार

पुणे : वाचनप्रेमींसाठी ज्ञानाची पर्वणी ठरणारा आणि शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ यंदा अधिक भव्य आणि वैविध्यपूर्ण स्वरूपात असणार आहे. महोत्सवाचे हे तिसरे पर्व येत्या १३ ते २१ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित करण्यात आले असून, यामध्ये तब्बल ८०० पुस्तकांची दालने, सहा दिवसीय साहित्य महोत्सव आणि विविध आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय पुस्तक न्यासचे (एनबीटी) संचालक युवराज मलिक आणि महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
गेल्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर यंदाचा महोत्सव अधिक मोठा असणार आहे. मागील वर्षीच्या ७०० दालनांच्या तुलनेत यंदा विविध भारतीय भाषांमधील पुस्तकांची ८०० दालने वाचकांच्या भेटीला येणार आहेत. १५ लाखांहून अधिक पुस्तकप्रेमी या महोत्सवाला भेट देतील आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
महोत्सवात लहान मुलांसाठी खास ‘चिल्ड्रेन कॉर्नर’ उभारण्यात येणार असून, यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, विविध कार्यशाळा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाईल. तसेच, ‘जॉय ऑफ रीडिंग’ या संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा आणि लेखकांसाठी ‘ऑथर कॉर्नर’ हे देखील महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. यासोबतच, पुस्तक खरेदीचा आनंद घेणाऱ्या खवय्यांसाठी ३० हून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत.
ज्ञानाचा, संस्कृतीचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव “पुणे पुस्तक महोत्सव हा केवळ पुस्तकांचा मेळा नाही, तर तो ज्ञान, संस्कृती, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय भावनेचा उत्सव आहे. हा पुणेकरांचा महोत्सव असून, यातून वाचन चळवळ अधिक समृद्ध होत आहे. सर्व पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या अद्वितीय महोत्सवात सहभागी व्हावे.
राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव





