Pune : व्यापाऱ्यांना पाठविल्या कोऱ्या नोटिसा; बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार

बिबवेवाडी – पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे व्यापाऱ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील निरीक्षकाने व्यापाऱ्यांना कोऱ्या नोटीस पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या नोटीस नेमक्या कशासाठी, याच माहिती मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनी अशा कारभाराचा संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी केली आहे.
पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या आकाशचिन्ह परवाना निरीक्षक विजय धनवाल यांनी व्यापारी व दुकानदारांना कोऱ्या नोटीस पाठवल्याचे निदर्शनास आले आहे. विभागात एकच परवाना निरीक्षक असतानाही तीन वेगवेगळ्या सह्या असलेल्या नोटीस व्यापाऱ्यांना कशासाठी देण्यात आल्या, याबाबत व्यापारी विचारणा करीत आहेत.
परंतु, याबाबतची योग्य माहिती उपलब्ध झाली नाही. या प्रकरणी भरत सुराणा यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, आकाश चिन्ह व परवाना विभागाचे अतिरिक्त आयुक्त तसेच दक्षता कार्यालयाच्या उपायुक्तांना निवेदन दिले आहे.
यावेळी सुराणा यांनी सांगितले की, नोटीस पाठविण्याचा अधिकार केवळ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे असूनही निरीक्षकांनी नियम डावलून नोटीस पाठवल्या.
दुकानाच्या नामफलकाच्या बाबत नवीन नियमावली संदर्भात विधी विभागाकडून प्रस्ताव आयुक्तांकडे प्रलंबित आहे, असे असताना त्याबाबत व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून त्रास देणे योग्य नाही. निरीक्षकांबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यांच्याविरुद्ध बिबवेवाडी कार्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले होते. संबंधीत प्रकरणी कशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भरत सुराणा यांनी केली आहे. काँग्रेसच्या व्यापारी सेलकडूनही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
‘नोटीस देणे हे माझा कायदेशीर कर्तव्याचा भाग आहे. तक्रारदाराने सदर बाबत पूर्णतः कायदेशीर माहिती घ्यावी तक्रारीच्या अनुषंगाने मी आयुक्तांकडे खुलासा करेल. मी कोणतीही चुकीची बाब केलेली नाही.’ – विजय थनवाल, आकाशचिन्ह परवाना निरीक्षक, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय





