PUNE: अधिकारी, कर्मचारी यांना बायोमेट्रिक हजेरीचे वावडे

डॉ.राजू गुरव
पुणे – राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील काही अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयात येण्याच्या व जाण्याच्या वेळा पाळत नाहीत. अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत घरगुती व वैयक्तिक कामे करण्यासाठी सतत गायब होत असतात. या अधिकारी, कर्मचारी यांना शिस्तीचे धडे देण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.
अधिकारी व कर्मचारी यांच्या हजेरीसाठी बायोेमेट्रिक कार्यालयात मशिन बसवुन काही दिवस लोटले आहेत. मात्र तरीही अद्यापही बायोेमेट्रिकद्वारे हजेरीच नोंदविली जात नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांना बायोेमेट्रिक हजेरीचे वावडेच आहे असे चित्र आढळुन येऊ लागले आहे.
पुण्यातील सेंट्रल बिल्डींगमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय हे राज्यातील एक महत्वाचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रामुख्याने लोकप्रतिनिधी, शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी काही ना काही कामानिमित्त नेहमी येत असतात. यामुळे हे कार्यालय दिवसभरच गर्दीनेच गजबजलेले असते. काही एजंट मंडळीही कार्यालयाच्या आवारात तळ ठोकून बसलेले असतात.
कार्यालयातील कामे जलद गतीने मार्गीच लागत नाहीत. काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत कधीच जाग्यावर सापडत नाहीत. ते कार्यालयात उशिरा येतात अन लवकर गायब होतात. यामुळे कार्यालयातील महत्वाची कामे मात्र खोळंबत असतात. फायलीही अस्ताव्यस्तपणे पडलेल्या असतात. पाहिजे तेव्हा फायली सापडतही नाहीत. अधिकारी यांचे कर्मचारी यांच्या कामकाजावर फारसे नियंत्रणच नसल्याने काही कर्मचारी अनागोंदी कारभार करण्यातच व्यस्त असतात.
राज्य शासनाने अधिकारी, कर्मचारी यांच्या हजेरीसाठी बायोेमेट्रिक पध्दतीचा अवलंब करण्याचे बंधन पुर्वीच घातलेले आहे. करोना मुळे काही कालावधीसाठी बायोेमेट्रिक पध्दत तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर शासनाने पुन्हा हजेरीसाठी बायोेमेट्रिक पध्दतीचाच वापर करण्याचे आदेश जारी केलेले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयात मागील काही वर्षापासून हजेरीसाठी बायोेमेट्रिक पध्दतीचा अवलंब करण्याचा विसरच पडलेला होता.
अखेर उशिराने का होईना पण कार्यालयाला जाग आलीच. काही दिवसांपुर्वी सुमारे लाखभर रुपये खर्च करुन बायोेमेट्रिक हजेरीचे मशिन खरेदी करण्यात आले. ही यंत्रणा संचालकांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आली. मात्र कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची प्राथमिक नोंदणीची प्रक्रियाही अद्याप पुर्ण करण्यात आलेली नाही.
काही जणांचा तीव्र विरोध
दररोज बायोेमेट्रिकनेच हजेरीचे नोंदविण्याबाबत अद्यापही सविस्तर सूचनांचे लेखी आदेश अधिकारी, कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचलेलेच नाहीत. त्यामुळे बायोेमेट्रिक हजेरीचे मशिन बसवुनही प्रत्यक्ष हजेरी नोंदविण्यास टाळाटाळच केली जात आहे. काही लेटलतिफची सवय असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा बायोेमेट्रिक हजेरीस तीव्र विरोधच असल्याचे दिसून येत आहे. मात्र या विरोधाला थारा न देता बायोमेट्रिक हजेरीची सर्वांनाच सक्ती करण्याची आवश्यकता आहे.





