Pune : कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी होणार बंधनकारक

पुणे : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये ओस पडत असून, खासगी क्लास मात्र विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुल्ल भरलेले असतात. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढ व्हावी यासाठी विदयार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून हालचालीही सुरु झाल्या आहेत.
राज्यात पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, लातूर अशा शहरांमध्ये जेईई, नीट, एमएचटी-सीईटी अशा प्रवेश परीक्षांची तयारी विद्यार्थी अकरावीपासूनच सुरू करतात. त्यासाठी विद्यार्थी खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतात. विद्यार्थी पारपांरिक अभ्यासक्रमाएवजी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अधिक प्रयत्नात असतात. त्यासाठी त्यांना विविध प्रवेश परीक्षाही द्याव्या लागतात. त्यासाठी विद्यार्थ्यांचा खासगी क्लासकडे ओढा अधिक असल्याचे आढळुन येते.
खासगी क्लासचे कनिष्ठ महाविद्यालयांशी टायअप असल्याने विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थिती परस्पर नोंदवली जाते. विद्यार्थी केवळ प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात जातात. महाविद्यालयातील वर्गांकडे विद्यार्थी सतत गैरहजर राहतात. आता कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीची पद्धत अवलंबण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवण्याच्या सूचना या पूर्वीच देण्यात आल्या आहेत. मात्र कोठेही त्याची काटोकोर अंमलबजावणी फारशी होताना आढळत नाही. आता पुन्हा बायोमेट्रिक हजेरीचा विषय चर्चेत आला आहे.
बायोमेट्रिक प्रणालीत फेस रेकग्निशन, बोटांचे ठसे आवश्यक असल्याने विद्यार्थी स्वतः वर्गात उपस्थित नसल्यास त्यांची उपस्थिती नोंदवली जाणार नाही. विद्यार्थ्याची ७५ टक्के उपस्थिती नोंदविली गेल्यासच तो राज्य मंडळाची परीक्षा देण्यास पात्र ठरेल. याबाबतचा धोरणात्मक निर्णय झाल्यास खासगी क्लासवर आपोआप नियंत्रण येणार आहे.




