Pune market yard: मार्केट यार्डातील फळे आणि भाजीपाला विभागात दुचाकी प्रवेशाची वेळ वाढवली

पुणे – मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागात दुचाकींना प्रवेश देण्यास सहा दिवसांपूर्वी सुरूवात झाली होती. दुपारी १ ते २ या वेळेत प्रवेश देण्यात येत होता. मात्र, श्री छपत्रती शिवाजी महाराज आडते असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता दुपारी १२.३० ते अडीच या दोन तासाच्या वेळेत दुचाकींना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह आडतदारांना दिलासा मिळाला आहे. व्यापार वाढीसही याचा फायदा होणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी सकाळी ११ ते १२ या वेळेत दुचाकींना प्रवेश देण्यात येत होता. मात्र, बाजार समितीने आदेश काढून दुचाकींचा प्रवेश पूर्णपणे बंद केला होता. आंब्याचा हंगाम असल्याने दुचाकी चालविण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत होती. दुचाकीला प्रवेश नसल्याचा परिणाम व्यापारावर होत आहे. १० ते २० टक्के व्यापार कमी होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. आता आडते असोसिएशनने दिलेल्या पत्रानुसार बाजार समिती प्रशासनाने वेळ वाढवून दिली आहे.
फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभागात दुचाकी वाहनांना प्रवेश बंद केलामुळे व्यापार घटला होता. परिणामी, शेतीमालाला कमी भाव मिळत होता. त्यानंतर बाजारात एक तास दुचाकी प्रवेशास परवानगी दिली होती. प्रवेशाची वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी आडते असोसिशनने पत्राद्वारे बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. आहे. त्याला यश आले आहे. सभापती दिलीप काळभोर व सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांचे मी आभार मानतो. – अनिरूध्द ऊर्फ बाप्पू भोसले, (अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन)





