Pune: भीमराव तापकीर पुन्हा भेदणार ‘खडक’…?

पुणे – खडकवासला विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडून कोणला उमेदवारी मिळणार, विद्यमानांना पुन्हा संधी दिली जाणार का, नवीन चेहरा असणार का, याबाबत मतदारसंघात उलट-सुलट चर्चा सुरू होती. मात्र, भाजपकडून भिमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर होताच राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सचिन दोडके आणि मनसेकडून मयुर रमेश वांजळे यांची उमेदवारी जाहीर झाली असून भिमराव तापकीर पुन्हा एकदा चौथ्यांदा मैदान मारणार की त्यांना कोणा आव्हान देणार, याची उत्स्कुता असणार आहे.
खडकवासला मतदारसंघात रमेश वांजळे यांच्या निधनानंतर २०११ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून भिमीराव तापकीर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी तापकीर यांनी उभारलेली नियोजनबद्ध यंत्रणा आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या जोरावर मतदारांनी भरभरू दिलेल्या मतदानामुळे खडकवासल्यात भाजपची विजयी मुहुर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही तापकीर भरघोस मतांनी विजयी झाले होते.
तर, २०१९च्या निवडणुकीत मागील दोन टर्ममध्ये घराघरापर्यंत पोहचलेले आणि विकासकामामुळे तापकीरांनी विजय मिळवला होता. भाजपकडून २०२४ साठी खडकवासला मतदारसंघातील उमेदवाराचा चेहरा स्पष्ट होत नसल्याने पक्षातील इच्छुकांच्या आशा वाढल्या होत्या.
एवढचं काय तर उमेदवार बदलाच्या उलट-सुलट चर्चाही सुरू झाल्या. मात्र, भिमराव तापकीर यांनी जवळपास १३ वर्षात मतदारसंघात केलेली विकासकामे, शहरी भागासह ग्रामीणमधील नागरिकांच्या सुख-दु:खाद दिलेली साथ, त्यांच्या समस्या-अडचणींसाठी स्वत: धावून जाणारा आमदार अशी प्रतिमा मतदारसंघात आहे.
खडकवासला मतदारसंघ आपल्याकडे ठेवायचा असेल तर भिमराव तापकीर यांची उमेदवारीच योग्य ठरेल, असा विश्वास पक्षाला असल्यामुळे भाजपने दुसऱ्या यादी खडकवासल्यातून भिमराव तापकीर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. उमेदवारी जाहीर होताच, धनकवडी परिसरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत, आण्णांचा यंदा चौकार, अशी घोषणा देत जल्लोष केला. दरम्यान तापकीर येत्या २८ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
सर्वसमावेश नेतृत्व…
खडकवासला मतदारसंघात शहरी भागासह ग्रामीणमध्ये सर्वसमावेश नेतृत्व म्हणून भिमराव तापकीर यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे मागील तीन टर्ममध्ये धनकवडी, आंबेगाव, कात्रज, दत्तनगर, नऱ्हे, धायरी, सिंहगड रोड, वारजे, शिवणे, कोंढवे-धावडे, भुसारी काॅलनी, बावधन यासह ग्रामीणमधील खेडशिवापूर, गोऱ्हे यासह अन्य भागात मतदानाची टक्केवारी चांगली आहे. त्यामध्ये धनकवडी, भुसारी काॅलनी ही तापकीरांची मोठी व्होट बॅंक आहे.





