Pune : महापालिकेची उमेदवारी आम्हालाच पाहिजे!

खडकवासला – खडकवासला विधानसभा मतदारसंघ गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला झाला आहे. येथे सलग चार वेळा या पक्षाचे आमदार निवडून आले. स्थानिक पातळीवर बहुसंख्य नगरसेवकही भाजपचे असल्याने या मतदारसंघात भाजपचे राजकीय समीकरण भक्कम मानले जात आहे.
परंतु, आता महापालिका निवडणुकीवेळी भाजपाच्या याच ताकदीचे ओझे विद्यमान आमदारांवर पडणार आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या नगरसेवकांनी आमदारांच्या विजयासाठी झटून प्रयत्न केले. आमदारकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांनीही तिकीटाची अपेक्षा मनात ठेवून काम केले काहींनी माघार घेतली.
साहजिकच असे माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते आता महापालिकेच्या उमेदवारीसाठी आमदारांना गळ घालू लागले आहेत. तुम्हाला आमदारकीला मदत केली आता आमची वेळ, असे म्हणणारे पदाधिकारी महापालिकेची उमेदवारी आम्हालाच, अशी अपेक्षा बाळगुन आहेत, अशांची संख्या मोठी असल्याने आमदारांसाठी हिच ताकद अशा प्रकारे डोकेदुखीचे कारण ठरत असल्याची चर्चा आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाचे यश हे सामूहिक असते. परंतु, निवडणुकीवेळी उमेदवारीचे निर्णय हे वैयक्तिक नाराजीला खतपाणी घालतात. काही ठिकाणी ही नाराजी उघडपणे दिसत नाही, पण आतून उसळत असते. खडकवासल्यातही आता काही ठिकाणी तेच दिसू लागले आहे. आगामी स्थानिक निवडणुकीत ठराविक जागांवर इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गट-तटांचे गणित अवघड होऊ लागले आहे.
यातूनच आता खरी कसोटी आमदारांच्या नेतृत्वगुणांची लागणार आहे. सर्वांना सोबत घेत, गटबाजी न वाढवता आणि योग्य उमेदवारांची निवड करून पक्षाचे वर्चस्व टिकवणे ही त्यांच्यासाठी मोठी परीक्षा ठरणार आहे. संघटनात्मक ताकद ही मतांत रूपांतरित करायची असेल, तर समन्वय, संवाद आणि संयम हेच शस्त्र ठरतील, याची कल्पना आमदारांना आहे.
खडकवासल्यात भाजपने आजवर विकासाच्या आणि पक्षनिष्ठेच्या जोरावर विजय मिळवला आहे. पण, पक्षातील असंतोष जर वाढला तर तोच विजयाचा पाया ढासळवू शकतो. त्यामुळे एकजूट हेच यशाचे सूत्र, हे आमदारांनी लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे अनेक जण उघडपणे सांगत आहेत.





