Pune : पुण्यातही उभारणार भारत मंडपम

पुणे : केंद्र शासनाच्या भारत मंडपम या सांस्कृतिक केंद्राच्या धर्तीवर पुण्यातही भारत मंडपम उभारण्याच्या सूचना नगर विकास विभागाने पुणे महापालिकेला दिल्या आहेत. भारत मंडपमसाठी 30 एकर क्षेत्र आरक्षित ठेवण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. पुण्यातही भारत मंडपम उभारले, तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन, व्यापार मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध परिषदा, अधिवेशन घेणे शक्य होणार आहे.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ऑक्टोबर 2024 मध्ये पर्यटनास चालना मिळावी, यासाठी पुणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये किमान 100 एकर एवढे क्षेत्र प्रदर्शने, परिषदा, यांसाठी राखून ठेवावे, अशी विनंती नगरविकास विभागाला केली होती, तसेच राज्य शासनाने 100 दिवसांच्या विशेष कृती आराखडा तयार केला असून, या कृती आराखड्यामध्ये भारत मंडपम हा विषय अंतर्भूत आहे.
त्यामुळे भारत मंडपम सांस्कृतिक केंद्राच्या धर्तीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये, तसेच प्रत्येक महसूल विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणीही असे केंद्र उभारण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. भारत मंडपमसाठी 30 एकर क्षेत्र आरक्षित ठेवण्याचे आदेश नगरविकास विभागाने पुणे महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या सहसचिव डॉ. प्रतिभा भदाणे यांनी दिले आहेत.
या आदेशाची कार्यवाही त्वरित सुरू करण्यात यावी, तसेच वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून आरक्षित जागेची निवड करावी. या जागेचे स्थळ विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानकापासून नजीकच्या परिसरात असावे, याची दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
लोकप्रतिनिधींची मागणी
पुणे हे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. शहरात अनेक मोठमोठे सांस्कृतिक कार्यकम, महोत्सव होत असतात. एकाच वेळी काही हजार लोक बसू शकतील, असे केंद्र पुण्यात नाही. त्यामुळे मोठे कार्यक्रम घेण्यास मर्यादा येतात. यासह पुणे येथे भारत मंडपमच्या धर्तीवर संगीत कला केंद्र, सांस्कृतिक केंद्र यासाठी आरक्षण ठेवण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी शासनास केली आहे.





