Pune Beed Railway: बीड-पुणे ट्रॅव्हल्सचे भाडे थेट ३५० रुपयांवर! रेल्वे धावताच खासगी ट्रॅव्हल्सची मनमानीला लगाम
Pune Beed Railway: प्रवाशांना रेल्वेचा भक्कम पर्याय उपलब्ध झाल्याने खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर तिकीट दर नियंत्रणात ठेवण्याचा दबाव; ऑनलाईन बुकिंगमध्ये किमती घसरल्याचे स्पष्ट.

Pune Beed Railway- पिंपरी चिंचवड ते बीड प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुणे-बीड रेल्वे सेवा सुरू होताच खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरावर त्याचा पहिला परिणाम पाहायला मिळाला आहे. यापूर्वी सुमारे ५०० रुपयांपासून सुरू होणारे ट्रॅव्हल्सचे तिकीट सणासुदीच्या काळात तब्बल १ हजार ते १ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या.
मात्र, रेल्वेचा पर्याय उपलब्ध होताच काही ट्रॅव्हल्सचे बीड-पुणे भाडे थेट ३५० रुपयांपर्यंत खाली आल्याचे ऑनलाइन बुकिंगमध्ये दिसून आले. रेल्वे सुरू होण्यापूर्वी पिंपरी चिंचवडहून बीडकडे जाणाऱ्या प्रवाशांसमोर खासगी ट्रॅव्हल्स हा प्रमुख पर्याय होता. त्यामुळे विशेषतः सण, सुटी आणि गर्दीच्या काळात तिकीट दर वाढल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत होत्या.
प्रवाशांची गरज आणि उपलब्ध जागांची मागणी यानुसार भाड्यात मोठे चढ-उतार होत होते. परिणामी सामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता. आता मात्र परिस्थितीत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे ते बीड रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सला पर्याय मिळाला आहे. परिणामी प्रवाशांना तिकीट बुक करण्यापूर्वी रेल्वे आणि ट्रॅव्हल्सचे भाडे, वेळ आणि सुविधा यांची तुलना करता येणार आहे.
खासगी ॲपवरील तिकीट दर तपासला असता काही ट्रॅव्हल्सचे पिंपरी चिंचवड ते बीड भाडे ३५० रुपयांपर्यंत खाली आलेले दिसून आले. रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत हा बदल प्रवाशांच्या विशेष लक्षात येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या स्पर्धेमुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांवर दर नियंत्रणात ठेवण्याचा दबाव निर्माण झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सणासुदीच्या भाडेवाढीला लगाम लागणार?
सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढली की तिकीट दरात मोठी वाढ होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी सातत्याने समोर आल्या आहेत. काही वेळा नियमित दराच्या तुलनेत तिकिटांसाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते. आता रेल्वेचा पर्याय उपलब्ध असल्याने प्रवाशांना एका वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागणार नाही.
प्रवाशांच्या खिशाला मिळणार दिलासा
पुणे-बीड मार्गावर रेल्वेची सेवा सुरू होणे हे केवळ नवीन वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यापुरते मर्यादित राहणार नाही. खासगी प्रवासी वाहतूक क्षेत्रातही त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. आज ३५० रुपयांपर्यंत आलेले ट्रॅव्हल्सचे भाडे हा त्याचाच सुरुवातीचा संकेत मानला जात आहे.
एक मात्र स्पष्ट आहे. प्रवाशांकडे पर्याय वाढला की वाहतूकदारांनाही स्पर्धेला सामोरे जावे लागते. पुणे-बीड रेल्वेच्या रूपाने प्रवाशांच्या हातात आता हाच पर्याय आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे महागड्या प्रवासाचा भार सहन करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सेवा कितपत आर्थिक दिलासा देते आणि ट्रॅव्हल्सचे भाडे किती नियंत्रणात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






