पुणे – अल्पवयीन मुलांच्या मदतीने सोसायटीच्या अकराव्या मजल्यावरील मधाचे पोळे काढल्याप्रकरणी तिघांविरुध्द सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेची काळजी न घेता तसेच बेकायदा मध विकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी ॲड. अमित असित शहा(४४,रा.मेघदुत टॉवर, धनकवडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार गोविंद मंडल, प्रेमकुमार मंडल(रा.हडपसर) आणि मल्लीनाथ निंबाळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता १२५ आणि ३(५) ही कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी ॲड.शहा हे बुधवारी घरी असताना त्यांना घरामध्ये धुर आणि मधमाशा येताना दिसल्या. त्यांनी बाहेर जाऊन बघितले असता, दोन लहान मुले दोरीला लटकून पार्किंग लेव्हलच्यावर अकराव्या मजल्यावरील रेफ्युजी एरियातील मधमाशांचे पोळे काढत होते. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा आणि दोन मोठ्या व्यक्ती मदतीला होत्या. त्यांनी यासंदर्भात सोसायटीच्या सदस्यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. तसेच अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेताना दिसले नाहीत.
पोळे काढल्याने सर्व मधमाश्या इमारतीमध्ये घोंघावत होत्या. यामुळे रहिवाशांना धोका निर्माण झाला होता. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी सोसायटीतील मल्लीनाथ निंबाळे यांनी बोलावून घेऊन पोळे काढण्यास सांगितल्याची माहिती दिली. हे काढलेले पोळे आणि त्यातील मध मृत मधमाश्या आणि कचऱ्यासह सोसायटीच्या बाहेरच विक्री केले जात होते. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत