PUNE: नववर्ष स्वागताला टाळा फटाक्यांचा मोह

पुणे – इंग्रजी नववर्ष स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्याची प्रथा मागच्या काही वर्षांत सुरू झाली आहे. पण, यंदा दिवाळीच्या काळातील पुण्यातील बिघडलेली हवा पाहता, हा मोह पुणेकरांनी टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि अन्य कारणांमुळे हवा प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यंदा तर दिवाळी काळात फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर पुढील तीन-चार दिवस फटाक्याचा धूर वातावरणात दिसून येत होता. या काळात पुण्यातील हवा सर्वांत खराब या वर्गवारीत मोजली गेली.
त्यावेळी लहान मुले आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांना सामोरे जावे लागले. त्यातून काही जण अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळे आता इंग्रजी नववर्ष स्वागताला आतषबाजी करू नये, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे. थंडीच्या काळात हवा प्रदूषण तसेच दमट हवेमुळे श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते. फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात. हवेत धुलिकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
प्रदूषकांचे प्रमाण मध्यम
सध्या पुणे आणि परिसरात हवेतील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण माॅडरेट म्हणजे मध्यम स्वरुपात आहे. आतषबाजी झाल्यास या प्रदूषकांचे प्रमाण वाढून हवा अशुद्ध होण्याची भीती आहे.





