Pune Auto Fare Hike : आजपासून रिक्षाचा प्रवास महाग; पुणेकरांना मोजावे लागणार अतिरिक्त पैसे
Pune Auto Fare Hike : ऑटोरिक्षाचे किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये

Pune Auto Fare Hike : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाने प्रवास करणं आजपासून महागले आहे. पुणे जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) रिक्षाच्या सुधारित भाडेदराला अधिकृत मंजुरी दिली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरटीए बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हे नवीन दर आजपासूनच (1 सप्टेंबर 2026 ) संपूर्ण जिल्ह्यात लागू झाले आहेत.
किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये (Pune Auto Fare Hike)
ऑटोरिक्षाचे पहिल्या 1.5 किलोमीटरसाठीचे किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आले आहे. यात थेट पाच रूपयांची मोठी वाढ झाली आहे. तसेच प्रति किलोमीटर भाडे 17 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आले आहे. नवीन दर पुणे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक ऑटोरिक्षांवर लागू असतील.
इंधनाचे वाढलेले भाव, गाड्यांचा वाढता देखभाल खर्च आणि विम्याची रक्कम लक्षात घेऊन आरटीओने ही भाडेवाढ केली आहे. 
पाच वर्षांत चौथ्यांदा भाडेवाढ
2021 पासून पुण्यात ऑटोरिक्षा भाड्यात ही चौथी वाढ आहे. 2021 मध्ये किमान भाडे 18 रुपये होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत आता ते 30 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच अवघ्या पाच वर्षांत किमान भाड्यात सुमारे 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मीटरचे कॅलिब्रेशन बंधनकारक
भाडेवाढ लागू झाल्यानंतर सर्व ऑटोरिक्षांचे मीटर पुन्हा कॅलिब्रेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी चालकांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तोपर्यंत प्रत्येक रिक्षाचालकाने अधिकृत भाडे तक्ता वाहनात लावणे आवश्यक असेल, जेणेकरून प्रवाशांना योग्य भाड्याची माहिती मिळेल आणि वाद टाळता येतील.
दरम्यान, या निर्णयाचा फायदा पुणे जिल्ह्यातील सुमारे 1.5 लाख ऑटो रिक्षाचालकांना होणार आहे. मात्र, दुसरीकडे दररोज ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. या भाडेवाढीवर अनेक प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा:





