Pune : पुण्यात NSS स्वयंसेवकांनी अग्निशमन जवानांना बांधल्या राख्या; कात्रज केंद्रात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन
Pune : पुण्यात भारती विद्यापीठाच्या NSS स्वयंसेवकांनी कात्रज अग्निशमन केंद्राला भेट देत जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले. बचावकार्याची प्रात्यक्षिकेही पाहिली.

Pune : नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी सदैव कर्तव्यावर असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना सण-उत्सव अनेकदा कुटुंबीयांसोबत साजरे करता येत नाहीत. ही जाणीव ठेवत भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, धनकवडी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS)च्या स्वयंसेवकांनी कात्रज अग्निशमन केंद्राला भेट देत जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) झालेल्या या उपक्रमात NSSच्या सुमारे ४० स्वयंसेवकांनी अग्निशमन दलाच्या जवानांकडून अग्निशमन आणि विविध बचावकार्यांची प्रात्यक्षिके पाहिली. यावेळी अग्निशमन दलाची कार्यपद्धती समजून घेत जवानांच्या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे कौतुक करण्यात आले.
रक्षाबंधनानिमित्त NSSच्या स्वयंसेविकांनी कात्रज अग्निशमन केंद्राचे उप अधिकारी वसंत खिलारे यांच्यासह सहकाऱ्यांना राख्या बांधल्या. जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या सेवाभावी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य ऋषिकेश देशमुख आणि उपप्राचार्य अमित पाटील यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा. विद्या खोबरे, प्रा. जागृती कडू आणि प्रा. मिनाक्षी दीक्षित यांच्यासह NSSचे ४० स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.
अग्निशमन जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, कृतज्ञता आणि सेवाभावाचा संदेश दिला.





