Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणात गुन्हा दाखल
Chandrakant Patil: संतोष पंडित याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे: उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संतोष पंडित याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या समाज माध्यमातील खात्यावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत नुकतीच प्रसारित केले.
‘जनतेच्या प्रश्नाची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे त्यापैकी एक आहेत’, असा मजकूर असलेली चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली. या चित्रफितीत अवमानकारक वक्तव्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक पांडे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
अश्लील, शिवराळ भाषा चित्रफितीत आहे. या चित्रफितीत अवमानकारक वक्तव्य करण्यात आले आहे, असे पांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३५६, २९६, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
हेही वाचा:
Indian Flag: अमेरिकेत तिरंग्याचा अवमान; किरेन रिजिजू संतापले, म्हणाले,”याची मोठी किंमत…”





