PUNE : थकबाकी वसुलीसाठी 200 मिळकतींचा लिलाव; उत्पन्न थांबल्याने पालिका आक्रमक भूमिकेत

पुणे – महापालिकेच्या मिळकतकराचे उत्पन्न 40 टक्के सवलत, तसेच थकबाकीमुळे गेल्या महिनाभरापासून 1,400 कोटींवर थांबले आहे. त्यामुळे, महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत बाकी न भरल्याने महापालिकेने सील केलेल्या 200 मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही प्रशासकीय कार्यवाही सुरू होणार असून डिसेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात लिलाव करण्याचे नियोजन केल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, या पूर्वी पालिकेने कात्रज येथील काही मिळकतींचा लिलाव करून मागील वर्षी 4 ते 5 कोटींची थकबाकी वसूल केली होती. त्यानंतर अनेक थकबाकीदारांनी कर भरला होता. मात्र, यावेळीही प्रशासन गंभीर असून यंदा 200 मिळकतींचा लिलाव केला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेने 2023-24 या वर्षासाठी 12 लाख 25 हजार करधारकांना बिले दिली आहेत. त्यातील जवळपास 8 लाख मिळकतींचा कर जमा झाला आहे.
तर, दाव्यांमुळे तसेच इतर कारणास्तव जवळपास तीन लाख करदाते कायमचे थकबाकीदार आहेत. परिणामी, मार्च 2024 अखेरपर्यंत आता केवळ लाखभर मिळकतींचा कर येणे बाकी असून त्यातील 40 टक्के सवलतीच्या गोंधळामुळे अनेक जण कर भरत नसल्याचे दिसते. जे चालू वर्षाचे थकबाकीदार आहेत, ते मार्च अखेरपर्यंत कर भरू शकतील. त्यामुळे, उत्पन्न वाढवायचे असेल तर मिळकती सील करणे तसेच त्यांचा लिलाव करणे हे पर्याय प्रशासनाने स्वीकारले आहेत. गेल्या दोन वर्षांत कर संकलन विभागाने 4 हजार 103 मिळकती सील केल्या आहेत, त्यांची थकबाकी तब्बल 243 कोटींची आहे.
अतिरिक्त मनुष्यबळास मान्यता
दरम्यान, मिळकतकर विभागास थकबाकीवसुली, मिळकती सील करणे तसेच लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी कर संकलन विभागास जवळपास 100 ते 150 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास महापालिका आयुक्तांनी सोमवारी कंत्राटी कामगार नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. लिलाव प्रक्रियेसाठी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त केल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी अधिकचे मनुष्यबळ आवश्यक असल्याने हे कर्मचारी तातडीने भरती केले जाणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पेठ निरीक्षकांवर जबाबदारी
दरम्यान, या लिलाव प्रक्रियेची जबाबदारी पेठ निरीक्षकांवर देण्यात आली आहे. या मिळकतींच्या बोजावर पालिकेचे नाव लावणे, शहर अभियंता कार्यालयाकडून मिळकतींचे मुल्यांकन करणे, नंतर आयुक्तांची मान्यता घेणे आणि त्यानंतर प्रत्यक्षात लिलाव करणे, अशी प्रक्रिया केली जाते. 1 ऑक्टोबरपासून प्रत्येक पेठ निरीक्षकाला 2 मिळकतीच्या लिलावाची जबाबदारी दिली जाणार असून प्रशासकीय प्रक्रिया नोव्हेंबरअखेर पूर्ण करून प्रत्यक्षात डिसेंबर 2023 मध्ये लिलाव प्रक्रिया केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.





