Pune: खूनाच्या प्रयत्नातील सराईताला पळून जाताना पकडले

पुणे – खूनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगार एसटी स्थानकातून पळून जाण्याच्या तयारीत असताना स्वारगेट पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपहरण, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर व अतिगंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो स्थानबध्देतून मुक्त होवून शहरात आला होता. अमोल रवी आडम (वय २४ रा. शंकरनगर, प्रथमेश अपार्टमेंट कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हा केल्यानंतर सराईत अमोल आडम हा १७ डिसेंबरला मुळगावी सोलापूरला जाणार आहे. तो स्वारगेट एसटी स्टॅण्ड येथून पळून जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि शिपाई राहुल तांबे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने स्वारगेट एसटी स्थानकातून सराईताला ताब्यात घेतले. त्याने १७ डिसेंबरला साथीदारांच्या मदतीने आंबेगाव कात्रज परिसरात दोघांवर शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर, संजय भापकर, शंकर संपते, सागर केकाण, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, सतिश कुंभार, विक्रम सावंत, रफिक नदाफ, शदर गोरे यांनी केली.





