पुणे : इच्छुकांचा रातोरात प्रभागांवर दावा

पुणे – कोणी विकासाचा चेहरा…तर कोण नव्या दमाचा नेता… तर कोण म्हणतंय.. जिथं गरज तिथं…., तर कोणाचा संकल्प विकासाचा आणि कोण म्हणतंय आमचं ठरलयं.. तर कोण म्हणतयं विकासाचा एकच नारा……. हमारा.. ! तर कोणी भावी महापौर.. अशा वेगवेगळ्या घोषवाक्यांच्या (स्लोगन) माध्यमातून महापालिकेची पायरी चढण्यासाठी सज्ज असलेल्या इच्छुकांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
काहींनी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मध्यरात्रीच नव्याने रचना झालेल्या प्रभागात सर्वत्र फ्लेक्स लावत प्रभागातील उमेदवारीवर दावा दाखल करण्यास सुरूवात केली आहे. आजी- माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे हे “स्लोगन वॉर’ सोशल मीडियावर सुरू झाले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या, तरी प्रचाराचा नारळ फोडत उमेदवारीचा दावा करण्यास सुरूवात झाली आहे.
महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च 2022 ला संपत असून, निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आरक्षण तसेच पुढील दीड ते दोन महिन्यांत पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी प्रचाराचा नारळ फोडत आपली दावेदारी सांगण्यास सुरूवात केली. दिवसभर फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवर स्टेटसच्या माध्यमातून तसेच मतदारांच्या ग्रुपवर हे फोटे शेअर केले जात होते. त्यामुळे, कोणत्या प्रभागात आणि कोणत्या भागात कोणी दावेदारी सांगितली आहे हे दिसून येत होते. अनेकांनी उमेदवारी जाहीर करत आपली दिशा स्पष्ट केल्याने, प्रभाग रचनेत आमने-सामने येणाऱ्या इच्छुकांत तिकिटासाठी संघर्ष सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
मकरसंक्रात जोरात
महापालिका निवडणुका साधारणपणे फेब्रुवारीत होतात. त्यामुळे जानेवारीत येणाऱ्या मकरसंक्रातीचे निमित्त साधत अनेक इच्छूक विविध कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षी करोनाचे सावट आणि प्रभाग रचना जाहीर झालेली नसल्याने अनेक इच्छुकांनी संक्रांतीचे कार्यक्रम “होल्ड’ केले होते. मात्र, प्रभाग रचना जाहीर झाल्याने तसेच निवडणुकांना वेळ असल्याने अनेकांकडून पुन्हा एकदा मकरसंक्रातीचे कार्यक्रम घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.





