Pune : स्वानंद प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी साजरी

पुणे : पुण्यातील धायरीतील स्वानंद प्राथमिक विद्यालयात नुकताच आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. इ. १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थी वारकरी वेशात आले होते.
अनेक विद्यार्थ्यांनी अभंगाचे सादरीकरण केले. शाळेतील इ. २ री मधून श्रीवतच अग्निहोत्री, शौनक अग्निहोत्री, इ. ३ री ध्रुव खेकाळे, इ. ४ थी विभास देशपांडे, इ. ७ वी रविराज बिरादार, इ. ५ वी वेदांत माने यांनी विशेष सादरीकरण केले.
वारकरी संप्रदायातील पावली हा नृत्यप्रकार सादर करताना इ. ५ वी ते ७ वी चे विद्यार्थी तल्लीन झाले होते. इ. १ ली ते ४ थी विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, श्री रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताई, संत सोपानदेव, संत चोखामेळा अशा विविध भूमिका साकारल्या. इ. ३ री ७ वी च्या विद्यार्थिनींनी टाळनृत्य सादर केले.
सर्व विद्यार्थ्यांनी दिंडीयात्रेत सहभाग नोंदविला. अतिशय उत्साहात व भक्तीमय वातावरणात श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीच्या जयघोषाने स्वानंद परिसर दणाणला. सर्व शिक्षक व पालक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल धावडे यांनी केले व पावली टाळ नृत्यप्रकाराला मार्गदर्शन वंदना कदम यांनी केले.





