Pune : प्रॉपर्टी कार्ड नोंदीसाठी घरबसल्या अर्ज

गणेश आंग्रे
पुणे – भूमिअभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिकेवरील खरेदी नोंदी, वारसनोंदीसाठी ईप्सित ही संगणक प्रणाली लागू केली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना या नोंदीसाठी आता नगर भूमापन कार्यालयात अथवा उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरसबल्या या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
भूमिअभिलेख विभागाने सातबारा उताऱ्यावरील वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे आदींसाठी ई हक्क प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता त्याच धर्तीवर आता ईप्सित म्हणजेच इलेक्ट्राॉनिक प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ही संगणक प्रणाली तयार केली असून या mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याविषयी माहिती देताना भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांत दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या वाड्या आणि गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाकडून हाती घेण्यात आले आहे, तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये यापूर्वीच सर्व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत. राज्यात सुमारे 91 लाख मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत.
प्रॉपर्टी कार्डवरील वारसनोंद, खरेदी खतानुसार नोंदी घेण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अर्जाची सद्यस्थितीही नागरिकांना समजणार आहे. – डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, जमाबंदी
यासाठी करता येणार ऑनलाइन अर्ज
प्रॉपर्टी कार्डवरील वारसनोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासह खरेदी नोंदीसाठी, बक्षीसपत्र नोंदी, गहाणखत/बोजा दाखल करणे अथवा कमी करणे आणि हक्कसोड पत्रानुसार नोंदी करणे आदींसाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
अशी आहे प्रक्रिया
https://epsit.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर नागरिकांना प्रॉपर्टी कार्डवरील फेरफारसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. नागरिकांनी सर्वप्रथम ईप्सित प्रणालीमध्ये स्वत:चा मोबाइल नंबर टाकून स्वत:चे लॉगिन तयार करावे, इतराच्या लॉगिनमधून अर्ज करता येणार नसल्याचे भूमिअभिलेख विभागाने म्हटले आहे.
ईप्सित प्रणालीमध्ये नागरिकांनी अर्जाच्या सर्व टॅबमध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज फेरफार नोंद घेण्यासाठी सेंड या बटणावर क्लिक केल्यावर अर्ज सबमिट होईल, तसेच नागरिकांना अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या लॉगिनमध्ये पाहता येईल. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींसाठी हेल्पलाइन नंबर – 02025712712 वर संपर्क साधावा, असे आवाहन भूमिअभिलेख विभागाने केले आहे.





