Pune : जिल्हा पर्यटनासाठी लवकरच ऍप – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे – जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी होत आहे, तसेच शनिवारी- रविवारी या सुट्टीच्या दिवशी तर तरुणांची पर्यटनस्थळावर गर्दीच गर्दी होते. यामुळे पर्यटन स्थळे बंद ठेवावी लागतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक ऍप विकसित करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आता पर्यटनस्थळावर जाण्यासाठी स्लॉट बुक करण्याची, तसेच ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळेनुसार गर्दी टाळून पर्यटनस्थळी जाणे शक्य होणार आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा पुलावरील दुर्घटनेत चार पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, तसेच मागील आठवड्यात मुळशी येथील अंधारबन येथे एकाच वेळी काही हजार पर्यटक आल्याने गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रवेश देणे टाळले, तसेच अंधारबन हे पर्यटन स्थळ अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला.
पुणे जिल्ह्यात गड- किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश, लेण्या, ऐतिहासिक वारसास्थळे अशी पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत. या पर्यटनस्थळांना जोडणारी कनेक्टिव्हीटीही आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटकांबरोबरच परराज्य आणि परदेशातून पर्यटनासाठी या जिल्ह्यात येणाऱ्यांची मोठी संख्या आहे. मात्र, ही ठिकाणे कुठे आहेत, तेथे जाण्यासाठी ट्रान्सपोर्टची काय आणि कोठून सुविधा आहे.
निवास आणि खाण्यापिण्याच्या काय सुविधा आहेत, यांची एकत्रित माहिती पर्यटकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा फसवणुकीचे प्रकारही होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील १३८ पर्यटन स्थळे आहेत. त्या सर्व ठिकाणांची माहिती, त्यांची वैशिष्ट्ये, त्या ठिकाणी असलेल्या स्पोर्ट्स सुविधांसह सर्व माहिती देणारे ॲप विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले, की पर्यटनस्थळांवर एकाचवेळी पर्यटकांची गर्दी उसळू नये. पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात. ही स्थळे कुठे आहेत, त्यासाठी कनेक्टिव्हीटी काय उपलब्ध आहे, अशा सर्व गोष्टींची माहिती पर्यटकांना एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





