Pune: ब्रेमेन चौकात पुन्हा घात; विद्युत रोहित्राला स्पर्श झाल्याने दोन तरुणांचा मृत्यू

पुणे : विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री औंधमधील ब्रेमेन चौकात घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तरुण ब्रेमेन चौकातील एका पडीक जागेत दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी जवळच्या असलेल्या एका विद्युत रोहित्राला त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली.
विनोद चिंतामण क्षीरसागर ( २९, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निकाळजे ( २७, रा. पौड रस्ता, कोथरूड) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि सौरभ हे मित्र आहेत. ओैंधमधील ब्रेमेन चौकात महावितरणाचा रोहित्र आहे. रोहित्राजवळ पडीक जागा आहे. या जागेचा वापर कोणी करत नाहीत.
रविवारी रात्री दोघे जण विद्युत रोहित्राजवळील पडीक जागेत मद्यपान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रोहित्रातून उतरलेल्या विद्युत प्रवाहाला त्यांचा स्पर्श झाला. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी दोन तरुण रोहित्राजवळ असलेल्या पडीक जागेत मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.
ब्रेमेन चौकातील तिसरी घटना –
ब्रेमेन चौकात दोन वर्षांपूर्वी साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच भागात चार वर्षांपूर्वी एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री ब्रेमेन चौकातील रोहित्राजवळ असलेल्या पडीक जागेत मद्यपान करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. रोहित्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेत स्थानिक तरुण नेहमी मद्यपान करण्यासाठी जातात. तेथे काटेरी कुंपण घालणे गरजेचे आहे.





