Pune : अमृतमहोत्सवी वर्ष केवळ अमृततुल्यावर

पुणे : ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक ठेवा असलेले शहर म्हणून पुण्याची विशेष ओळख आहे. शहराचा कारभार पाहणाऱ्या महापालिकेचा यावर्षी अमृत महोत्सवी वर्धापन दिन ( ७५ वर्षे ) दि. १५ फेब्रुवारीला साजरा केला जात आहे. महापालिका तसेच पुणेकरांसाठी हा अभिनाचा क्षण असताना महापालिका प्रशासन मात्र हा दिवस साजरा करण्यासाठी निरूत्साही असल्याचे समोर आले आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महापालिकेकडून शहरात केवळ चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.
महापालिकेवर मागील तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांकडूनही या अमृतमहोत्सवाकडे दूर्लक्ष करण्यात आले असल्याने या वर्षभरात कोणताही नवीन उपक्रम, योजना तसेच कार्यक्रम महापालिका प्रशासनास निश्चित करता आलेल्या नाहीत. यावरून महापालिकेचे माजी नगरसेवक तसेच माजी महापौर संघटनेकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
महापालिकेची स्थापना दि. १५ फेब्रुवारी १९५० मध्ये झाली. त्यामुळे दरवर्षी १५ फेब्रुवारीला महापालिकेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आठवडाभर कर्मचार्यांसाठीए विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यावर्षी मात्र महापालिकेचा ७५वा वर्धापन दिन अमृतमोहत्सवी असताना याचा विसर प्रशासक राजवटीत प्रशासनाला पडला आहे.
हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे लक्षात आल्यानंतर मागील दिड महिन्यांपासून आयुक्तांकडून कार्यक्रम निश्चित करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या, हे कार्यक्रम ठरविण्यासाठी समित्याही निश्चित करण्यात आल्या. मात्र, या समित्यांनी वर्धापनदिनाचा विसर पडल्याने त्यांच्याकडून पुढील वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन केवळ कागदावर करण्यात आले.
माजी महापौरांनी व्यक्त केली नाराजी….
महापालिका प्रशासनाच्या या निरूत्साहावरून शहरातील माजी महापौर संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अमृत महोत्सवी वर्षांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापालिचा गेली तीन वर्ष हा वर्धापन दिन साजराच केला गेलेला नाही. खरं म्हटलं तर ही जबाबदारी प्रशासकीय काळामध्ये प्रशासनाची होती, ती त्यांनी पूर्ण केली नाही याची खंत वाटते. अमृतवर्ष निमित्ताने अनेक नवीन प्रकल्प, योजना या सुरू करायला हव्या होत्या. परंतु, प्रशासनाला त्याची आवश्यकता वाटली नाही. प्रशासनाने किमान सर्व माजी नगरसेवकांना नाही, निदान माजी महापौर संघटनेला आमंत्रित करून काही सूचना घेतल्या असत्या तर हा वर्धापन दिन उत्तमपणे साजरा करता आला असता, अशा शब्दात संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.




