पुणे : लोहगाव विमानतळाच्या मुख्य रस्त्यासह आसपासच्या परिसरात मोठया प्रमाणात अस्वच्छता असते. त्यामुळे, परिसरात मोठया प्रमाणावर प्राणी, पक्ष्यांचा वावर वाढला असून त्यामुळे विमानांच्या उड्डाणात अथडळे निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने आता विमानतळाच्या चार किलोमीटरच्या परिसरात प्रत्येक आठ तासांनी स्वच्छता करण्य़ाचा निर्णय घेतला आहे. या स्वच्छतेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली. विमानतळ परिसरातील अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत विमानतळ प्राधिकरणाने पालिकेकडे तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच नगररस्ता- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाकडे या कामाची जबाबदरी देण्यात दिली असून दररोज त्याचा अहवाल मुख्य विभागास सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विमानतळ परिसरात गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यातच, यातील काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेला असल्याने त्या भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने तसेच नागरिकांकडूनही मोकळया जागांमध्ये कचरा टाक जात असल्याने परिसरात प्राणी, पक्षांची संख्या वाढलेली दिसते. तसेच बांधकामे सुरू असल्याने मोठया प्रमाणात राडारोडा टाकला जात असून तो उचलला जात नसल्याने कालांतराने नागरीक त्यावरच कचरा टाकत असतात. या स्थितीत तेथे क्राॅनिक स्पाॅट तयार होत आहेत. ही होणार कामे – ५०९ चौक ते नागपूर चाळ, कलवड वस्तीपरिसरात दररोज स्वच्छता – व्हीआयपी रस्त्यावरील क्रॉनिक स्पॉट नष्ट करणार – ओपन प्लॉट बंदिस्त करून स्वच्छ ठेवणार. – दैनंदिन डीप क्लिनिंग होणार