हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे अनधिकृतपणे खासगी बसेसची होणारी पार्किंग आणि खासगी बसेसचा हडपसर परिसरातील थांबे आता शेवाळेवाडी (मांजरी बुद्रुक) येथे पीएमपीएमएल बस डेपोच्या जागेत हलवण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या विळख्यात असणारा रस्ता मोकळा मिळत आहे. याबाबत नागरिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे. आमदार चेतन तुपे यांनी रविवारी(दि. ९) रोजी स्वतः पावसात रस्त्यावर उतरून पोलिसांच्या मदतीने येतील खाजगी बसेस या शेवाळेवाडी येथील पीएमपीएल डेपोच्या दिलेल्या जागेत पाठवल्या. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे नागरिकांनी खास करून सोसायटी धारकांनी कौतुक केले आहे. हडपसर उपनगरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर मगरपट्टा चौक ते पंधरा नंबर चौक दरम्यान खासगी ट्रॅव्हल बसचे ठिकठिकाणी अनाधिकृत थांबे आहेत. रस्त्यावर समांतर तीन-तीन ट्रॅव्हल बस तासनतास पार्किंग केल्या जातात. त्यामुळे हडपसर मधील या मुख्य रस्त्याचा श्वास रोखला गेला होता. यामुळे रस्त्यावरील खासगी बसचे अनाधिकृत थांबे हटवा, अशी मागणी केली जात होती. ट्रॅव्हल बसने संपूर्ण रस्त्याचा ताबाच घेऊन वाहतूक कोंडी केली होती. सोसायटी धारकांना किंवा इतर वाहनचालकांना रस्ताही दिला जात नव्हता. या कारणांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. आमदार चेतन तुपे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतरही अपेक्षित बदल होत नसल्याचे दिसून आल्यानंतर पुन्हा एकदा आमदार तुपे यांनी थेट कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहतूक पोलिसांनवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. याशिवाय या खासगी बसेस यांना प्रवासी घेण्यासाठी पीएमपीएलचा शेवाळेवाडी येथील जागाही सुचवण्यात आली होती. हडपसरमधील खाजगी बसेसचा असलेला अनधिकृत थांबा हा काही केल्या हलवण्यात यावा, यासाठी पोलीस, महापालिका व राज्यशासन याकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता. अखेर त्यास यश आल्याने समाधानाची भावना आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केली. खासगी बसेस आता शेवाळेवाडी स्थानकावर थांबणार पुणे-सोलापूर रस्ता हा हडपसर विधानसभा मतदारसंघातून जातो. हा मुख्य रस्ता असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. विशेषतः खाजगी वाहतूक करणाऱ्या मोठ्या बसेस या रस्त्यावरच थांबत असल्याने वाहतूक कोंडी, गर्दी, अपघाताची शक्यता होती. त्यामुळे अधिवेशनात, पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या बसेससाठी शेवाळेवाडी येथे थांब्यासाठी पीएमपीएमएलच्या बस डेपोत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. विधानसभेत देखील हा मुद्दा त्यांनी मांडला आणि आता त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रवाशांनी पुढे जाण्यासाठी आता शेवाळेवाडी येथेच यावे. तसेच खासगी बसेस व्यावसायिकांनी आपल्या बसेस दिलेल्या जागेवर घेवून जाव्यात. याची जनजागृती व्हावी यासाठी गेली तीन-चार दिवस परिसरात सूचना फलक लावले आहेत. रविवारी रात्री मी स्वतः, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच पोलीस अधिकारी व महापालिका कर्मचारी रस्त्यावर उतरून या खासगी बसेस दिलेल्या जागेत पाठवत होतो. आता यापुढे हडपसरमध्ये खासगी बसेस रस्त्यावर थांबणार नाहीत, असा विश्वास चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केला. प्रवाशांसाठी सूचनाफलक लावले दरम्यान, हडपसर येथील खाजगी बसेसचा थांबा आता शेवाळेवाडी येथील पीएमपीएल बस डेपोच्या जागेत हलवण्यात आला आहे. येथे जाण्यासाठी प्रवाशांनी कसे जावे, यासाठीचे सूचनाफलक हडपसरमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.