Pune: परवडणारी घरे महापालिकेलाही परवडली

पुणे : शहरातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरात २६५८ घरे बांधण्यात आली होती. या घरांसाठी महापालिकेकडून २८० कोटींचा खर्च करण्यात आला होता. या घरांच्या विक्रीतून महापालिकेस ३०३ कोटींचा निधी मिळाला आहे. तसेच शासनाकडूनही ६२ कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेसही ही घरे परवडल्याचे चित्र आहे.
केंद्रशासनाकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना घरे मिळावीत यासाठी पंतप्रधान आवास योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेकडून हडपसर, खराडी आणि वडगाव या ठिकाणी २६५८ घरे बांधण्यात आली होती. घरे नागरिकांना लाॅटरी पध्दतीने देण्यात आली. महापालिकेकडून या घरांच्या किमती सर्वसामन्य नागरिकांना परवडणाऱ्या असाव्यात यासाठी या घरांना दिल्या जाणाऱ्या जागांची किंमत शून्य करण्यात आली.
त्यामुळे, महापालिकेस ही घरे १२ ते १५ लाख रूपयांमध्ये विक्रीत उपलब्ध करून देता आली. या घरांना बांधकामासाठी २८० कोटींचा खर्च करण्यात आला. तर त्यांच्या विक्रीतून ३०३ कोटी मिळाले. या योजनेसाठी शासनाकडून ६६ कोटींचे अनुदान मंजूर असून, त्यातील ६२ कोटी महापालिकेस मिळाले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात ४ हजार घरे बांधणार
केंद्रशासनाने या योजनेतील दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यानुसार, महापालिकेकडून शहरात पाच ठिकाणी सुमारे ४ हजार २६९ घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या नोंदणीसाठी महापालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत सुमारे २ हजार ७७७ जणांनी नोंदणी केलेली आहे. ही घरे सुमारे ३० चौरस मीटर ते ४१ चौरस मीटर असणार आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्यासाठी महापालिकेस आणखी दोन हजार जादा घरांना परवानगी मिळणार असून, त्यात भाडेतत्वावर घरे देण्याचाही समावेश आहे.





