Pune : उरवडे रस्त्यावर जवळपास 11 लाख रूपयांचा भेसळयुक्त खवा जप्त..

पिरंगुट(प्रतिनिधी) :- पिरंगुट (ता. मुळशी) येथील कृष्णा फूड याठिकाणी पौड पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला. या कारवाईत एकूण १० लाख ७३ हजार ६५० रुपयाचा साठा जप्त करण्यात आला.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट हद्दीत उरवडे रस्त्यावरील कोका कोला कंपनी जवळ असलेल्या कृष्णा फूड्स येथे भेसळयुक्त खवा व बर्फी बनवली जात आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार पौड पोलीस व अन्न औषध प्रशासन यांच्या वतीने येथे छापा टाकून दुधापासून बनवलेली बर्फी, स्कीम मिल्क पावडर, वनस्पती व पाम तेल असा एकूण १० लाख ७३ हजार ६५० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
तसेच सुमारे २ टन तयार बर्फी जप्त करत हा माल नाशवंत असल्याने तो जागेवरच नष्ट करण्यात आला. उर्वरित माल अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात देण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या नियम व अटींचे पालन न केल्याच्या तपासणीत आढळून आल्याने सदर व्यावसायिकाला व्यवसाय बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलिस हवालदार रॉकी देवकाते, पोलिस नाईक सिद्धेश पाटील, साहिल शेख तसेच अन्न व औषध प्रशासनच्या सह आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड, सोपान इंगळे यांनी ही कारवाई केली.





