Pune : अभियांत्रिकी पदवीचे प्रवेश आजपासून

पुणे – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया दि. २८ जूनपासून सुरू होत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ जुलैपर्यंत आहे. दि. १७ जुलै रोजी अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले असून, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतरही अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य सीईटी सेलने शुक्रवारी अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये, तर अन्य गटातील विद्यार्थ्यांना ८०० रुपये अर्जाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
दि. २८ जून ते ८ जुलै या दरम्यान विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यानंतर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी दि. ३० जून ते ९ जुलै या कालवधीत होईल. दि. १२ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीवर काही आक्षेप अथवा हरकती नोंदविण्यासाठी दि. १३ ते १५ जुलै अशी मुदत देण्यात आली आहे. दि. १७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवेश फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. याचप्रमाणे पाच वर्षीय अभियांत्रिकीच्या इंटिग्रेडेट या पदव्युत्तर पदवीचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एमबीए प्रवेशही आजपासूनच
राज्य सीईटी सेलमार्फतच एमबीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एमबीएसाठी दि. २८ जून ते ८ जुलै या दरम्यान अर्ज करावयाचे आहे. दि. १२ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर दि. १७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
यंदा अभियांत्रिकी प्रवेशातील महत्त्वपूर्ण बदल
१. यंदा तीनऐवजी चार प्रवेश फेरी
२. पसंतीक्रमातील संस्थेत प्रवेश घेणे अनिवार्य
३. चार फेरीनंतर संस्थात्मक प्रवेशाला सुरुवात
४. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश गुणवत्तेनुसारच
५. कोट्यातील प्रवेशासाठी सीईटी सेलकडे करता येणार अर्ज





