Pune : ‘सय्यदनगर रेल्वे गेटवरून पादचाऱ्यांसाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात’; फारुख इनामदार यांची मागणी

हडपसर : सय्यद नगर रेल्वे गेट क्रमांक सात येथील फाटक कायमस्वरूपी बंद केले आहे. परंतु या ठिकाणावरून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार तसेच ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना ये-जा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक फारुख इनामदार यांनी केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सय्यदनगर रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. सुरवातीला रेल्वे प्रशासनाने विविध कामांसाठी हे गेट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते कायमस्वरूपी बंद करण्यात आले. सय्यदनगर रेल्वेगेट वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना खुले करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण या ठिकाणी आंदोलन ही केले होते. फाटक बंद केल्यानंतरही नागरीक फाटकाच्या बाजूने पायी ये-जा करत होते.
परंतु, रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे दोन्ही बाजूंना सिमेंट कॉक्रीटीकरणची संरक्षक भिंत घालून हे गेट पूर्णपणे बंद केले आहे. यामुळे या परिसरातील लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी नागरिकांच्या पायी ये-जा करण्यासाठी उपाय योजना करावे तसेच सय्यद नगर या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करावा ,अशी मागणी माजी नगरसेवक फारुख इनामदार यांनी केली आहे.
प्रस्तावित भुयारी पादचारी मार्गात दुचाकींना जाण्याची सोय करावी :
ससाणेनगर व सय्यदनगर येथील रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम प्रलंबित आहे. मागील काही वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू आहे. जवळपास दोन लाख लोकसंख्येचा हा परिसर आहे. रेल्वेने भिंत बांधल्याने पलीकडे जाता येत नाही. जर हा भुयारी मार्ग झाला तर मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा होईल.
काळेपडळ येथे देखील रेल्वेचे गेट बंद केले आहे. पण पादचाऱ्यांसाठी मार्ग होण्यासाठी मंजुरी मिळते आहे. पुणे मनपा याकामी पुढाकार घेत आहे. रेल्वे सोबत बैठका देखील झाल्या आहे. मात्र अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही. विद्यार्थ्यांची देखील मोठी गैरसोय होते आहे. अधिवेशनात राज्य सरकारला विनंती केली आहे की या प्रस्तावित भुयारी पादचारी मार्गात जर दुचाकींना जाण्याची सोय केली तर मोठा फायदा होईल.
– चेतन तुपे पाटील (आमदार ,हडपसर विधानसभा)
सय्यद नगर रेल्वे गेटवर स्कायवाक करावा :
सय्यद नगर रेल्वे गेटवर अनेक रस्ते एकत्र येतात. याशिवाय येथूनच नागरिकांची मोठी वर्दळ असते. येथून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची मोठी संख्या आहे. यांना फक्त गेट ओलांडून पायी ये-जा करावी लागते.
परंतु, आता संरक्षक भिंत उभी केल्याने पादचाऱ्यांनाही मोठा वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रेल्वे प्रशासनाने येथे भुयारी मार्ग करावा.याशिवाय स्कायवाक पूल करावा. किंवा अन्य उपाययोजना करून पादचाऱ्यांचा मार्ग सुकर करावा.
– फारुख इनामदार (माजी नगरसेवक)





