Pune : विद्यार्थिनींकडून शुल्क घेतल्यास कारवाई

पुणे – विद्यार्थिनींसाठीच्या मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी काही महाविद्यालये करीत नसल्याल्या तक्रारी आहेत. विद्यार्थिनींकडून शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाई करण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना दिला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) आणि इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) च्या मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्काच्या १०० टक्के सवलत दिली जाते. याची पूर्वी मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत होती.
त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतूनही विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षण योजना राबवली जाते. उच्च शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांसाठी ही योजना असून, विद्यार्थिनींकडून कोणतेही शिक्षण शुल्क आकारू नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.
काही महाविद्यालये याकडे दुर्लक्ष करत असून, विद्यार्थिनींकडून फी आकारत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्याची तपासणी करून संबंधित संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे. महाविद्यालयांनी याचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालकांना सादर करणे बंधनकारक आहे.





