Pune: नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कारवाई

विश्रांतवाडी – नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ४९१ होर्डिंगपैकी ११ धोकादायक होर्डिंग हटविण्यात आली आहेत. याप्रकरणी कारवाई अद्याप सुरू आहे, अशी माहिती परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी दिली.
वाघोलीत (एप्रिलमध्ये) घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर जोरदार कारवाइ करण्यात येत आहे. वाघोली वगळता अन्य दुर्घटनेत होर्डिंग मालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिल्यानुसार पुणे महापालिका आयुक्तांनीही सात दिवसांत धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिल्याने लोहगाव, वाघोली परिसरात सर्वेक्षण करून धोकादायक होर्डिंग हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोहगावमधील पाच तर वाघोली व खराडीमधील सहा असे ११ होर्डिंग हटविण्यात आले आहेत, कारवाई सुरूच आहे. सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करावे अशी नागरीकांची मागणी आहे. दरम्यान, जे होर्डिंग धोकादायक वाटतात, त्याबाबत नागरिकांनी संपर्क साधून माहिती द्यावी. त्याची पाहणी करून ते हटविण्यात येईल, असे परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी सांगितले.
होर्डिंगचे सांगाडे…
सध्या वळवाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे. या वाऱ्यामुळे होर्डिंगवर लावलेला फ्लेक्स फाटून कुठेही उडून पडतो. बहुतांश ते विद्युत तारांवर पडतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे फ्लेक्सचे कापड हटविण्याचा आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या सर्वत्र उभे असलेले होर्डिंगचे सांगाडेच सांगाडे दिसत आहेत.





