Pune : ‘स्वारगेट’ प्रकरणातील आरोपीने आणखी काही गुन्हे केल्याचा संशय; पोलिसांकडून तपास सुरू

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडे याच्या मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. गाडे याचे आईवडील यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराईताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ५:३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत २६ वर्षीय पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, गाडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, त्याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. तरुणीवर बलात्कार करून गाडे पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके तयार केली आहेत.
गाडेच्या संपर्कात असलेल्या १० मित्रांची पोलिसांनी चौकशी पोलिसांनी बुधवारी रात्री केली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून गाडेचा शोध घेण्यात येत आहे. गाडेचे आई-वडील आणि भावाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांना चौकशीसाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली





