पुणे: दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन

पुणे : सिगारेटचे पूर्वीचे पैसे मगितल्याचा राग मनात धरून पानटपरी दुकानातील साहित्याची कोयता आणि दगडांनी तोडफोड करून दुकानातील १३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी साहिल शकील सय्यद याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी जामीन मंजूर केला. त्याने अॅड. अभिषेक अवचट, अॅड. मजहर मुजावर आणि अॅड. महेश सदाफळ यांच्यामार्फत जमिनासाठी अर्ज दाखल केला होता.
४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास फिर्यादी पानशॉपमध्ये व्यवसाय करीत होते. त्यावेळी साहिल सय्यद व इतर मुले हे टपरीवरती गेले व १०० रुपयांची सिगरेट घेतली. त्यावेळेस साहिल याने पैसे न देता मला ओळखत नाही का ? मी वडगावशेरीचा भाई आहे, तुला धंदा करायचा नाही का? बोलून हाताने मारहाण केली.
त्यावेळेस त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी रात्री ९.१० वाजता साहिल व इतर ०४ ते ०५ मुले आरडाओरडा करत गेले. साहिल सय्यद याने कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या मनगटावर वार केला आणि १३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने गल्ल्यातून काढून नेले. हा गुन्हा दाखल करण्यास २२ तासांचा विलंब झाला आहे. मेडिकल रिपोर्ट अभिलेखावर दाखल नाही. तसेच आरोपीकडून कोणतीही रक्कम हस्तगत करण्यात आली, त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाने केली.





