Pune: नांदेड सिटीजवळ ड्रेनेज कामाच्या खड्ड्यात दुर्घटना; एका कामगाराचा मृत्यू, तिघांची सुटका

पुणे – नांदेड सिटीजवळ ड्रेनेज लाईनच्या कामाच्या ठिकाणी चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. या चार कामगारांना पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या पथकाने बाहेर काढले. यातील एका कामगाराचा चिखलाखाली दबून मृत्यू झाला. महापालिकेच्या नदी सुधार योजना जायका प्रकल्पाअंतर्गत हे काम सुरु होते.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनूसार, नांदेड सिटी नजीक कलाश्री इमारतीच्या सीमा भिंतीलगत नदीपात्र आहे. या ठिकाणी नदी सुधार योजना जायका प्रकल्पाअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. येथे खोदलेल्या खड्डयात काही कामगार काम करत होते. तर वरील भागात जेसीबीच्या माध्यमातून काम सुरु होते. सायंकाळी सहाच्या सुमारास खाली काम करणाऱ्या कामगारांवर मातीचा मोठा ठिगारा पडला.
याखाली चार कामगार अडकले गेले. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने तातडीने तेथे धाव घेतली. त्यांच्या मदतीला पुणे महापालिकेच्या कसबा अग्निशमन दलाचे वाहन पोहचले. ढिगाऱ्याखालून रात्री सात दरम्यान तीन कामगारांना काढण्यात आले. तर एक कामगार बेशुध्द अवस्थेत चिखलात दबला गेला होता. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकवाड आणि पीएमआरडीएचे अधिकारी सुजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य करण्यात आले.





