Pune: कल्याणीनगरमधील अपघात प्रकरण; जामीन अर्जावरील सुनावणी आता ५ जूनला

पुणे – कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर शनिवारी (दि.१ ) होणारी सुनावणी आता बुधवारी (दि. ५) होणार आहे.
या प्रकरणात आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती. त्यास बचाव पक्षाने विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने पोलिसांना शनिवारी (दि. १) आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली.
अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचा मालक नमन भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक पबचा असिस्टंट मॅनेजर संदीप सांगळे, कर्मचारी नीतेश शेवानी आणि ब्लॅकच्या बार काउंटर व्यवस्थापक जयेश गावकर यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या अर्जावर शनिवारी ( दि १) सुनावणी होणार होती. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, पुढील सुनावणी दि. ५ जून रोजी होणार असल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले आहे.





