Pune: दुर्घटना टळली अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला…. नेमकं काय घडलं?

बिबवेवाडी – महर्षी नगर येथे सिटी इंटरनॅशनल शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार समोर बांधकाम वस्तूंची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यात खचून एका बाजूला शाळेच्या गेट समोरच कलला. दुपारी चार वाजता शाळेच्या गेट समोरच हे घडल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. धक्कादायक म्हणजे शाळा सुटण्याच्या वेळेतच ही घटना घडली. मात्र सुदैवाने काल शाळेला सुट्टी असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
महर्षी नगर येथे सिटी इंटरनॅशनल शाळेच्या गेट समोर अनेक दिवसांपासून पासून पाईपलाईन टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे काल येथे माल वाहतूक करणारा मोठा ट्रक खचून एका बाजूला वाकला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामला लागणाऱ्या सामानाची पोती भरलेली होती. थोडक्यात मोठा अपघात होताना बचावला त्यातच काल पावसामुळे जिल्हाधिकारी यांनी शाळेला सुट्टी जाहीर केल्या मुळे शाळा बंद होती.
त्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता अशी भावना येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. महर्षी नगर भागात एका वजनदार हॉटेल चालकांच्या मर्जीनुसार येथील भागात वाहतूक पोलीस फिरकत नाहीत व बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांनवर व बेकायदेशीर वाहतुकीवर कोणतीही कारवाई करत नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
दरम्यान, गंगाधाम चौकात मागील महिन्यात डंपरने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांनी जड वाहने व डंपर वाहतूक दिवसा बंद करण्यासाठी आंदोलन केले होते. स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांनीही अवजड वाहने दिवसा वाहतूक बंद करण्याच्या सूनचा दिल्या होत्या. विविध राजकीय व सामाजिक पक्षाच्या आंदोलननानंतर पोलिसांनी परिसरात दिवसा डंपर वाहतुकीस स्थगिती दिली. मात्र परिसरात सरासपणे धोकादायक रित्या अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.





