Pune : यूपीएससीत चमकले राज्यातील ५० उमेदवार

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम निकालात पुण्याचा अर्चित डोंगरे याने देशात तिसरा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला. या परीक्षेत प्रयागराजची शक्ती दुबे हिने देशात पहिला, तर गुजरातमधील वडोदरा येथील हर्षिता गोयलने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. निकालात मुलींनी आघाडी घेतली आहे. राज्यातील ५० हून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत.
आयपीएस असलेल्या अर्चित डोंगरे याने पुन्हा यूपीएससीची परीक्षा देत थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली अन् महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला. यूपीएससी परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. यूपीएससीतर्फे नागरी सेवा परीक्षा २०२४ मधील लेखी परीक्षा सप्टेंबर २०२४ मध्ये, तर मुलाखती जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या. त्यानंतर शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
नागरी सेवा परीक्षा प्रक्रिया एकूण १ हजार १२९ पदांसाठी राबविण्यात आली. त्यात भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १८०, भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) ५५, भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) १४७, केंद्रीय सेवा ‘गट अ’च्या ६०५, तर ‘गट ब’च्या १४२ जागांचा समावेश आहे. त्यातील ५० जागा दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असल्याची माहिती देण्यात आली आहे. जाहीर केलेल्या निकालातील २४१ उमेदवारांची शिफारस तात्पुरती असून, एका उमेदवाराचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे यूपीएससीने नमूद केले आहे. लेखी परीक्षेतून १४ हजार ६२७ उमेदवार मुख्य लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. त्यातील २ हजार ८४५ उमेदवार अंतिम मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यापैकी ७२५ पुरुष, तर २८४ महिला उमेदवार अशा एकूण १००९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली.
यूपीएससी निकालात पुण्याच्या अर्चित डोंगरेने देशात तिसरे स्थान पटकावले आहे. त्याशिवाय पहिल्या शंभर उमेदवारांमध्येही राज्यातील काही उमेदवारांनी जागा मिळवली आहे. त्यात शिवांश जागडे २६ वा, आदिती चौघुले ६३ वा, साईचैतन्य जाधव ६८ वा, विवेक शिंदे ९३ वा, तेजस्वी देशपांडे ९९ वा क्रमांक प्राप्त केला आहे, तसेच शिफारसपात्र ठरलेल्या १ हजार ९ उमेदवारांमध्ये राज्यातील ५० हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे.
चांगल्या रँकसाठी अर्चितचा प्रयत्न
पुण्याचा अर्चित डोंगरे याने वेल्लोरमधील व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) पदवी घेतली आहे. परीक्षेसाठी त्याचा पर्यायी विषय तत्त्वज्ञान होता. अर्चितचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. यापूर्वी २०२३ मधील यूपीएससी परीक्षेत १५३ वा क्रमांक घेऊन तो उत्तीर्ण झाला आहे. चांगली रँक मिळण्यासाठी त्याने पुन्हा परीक्षा दिली होती. त्यात अर्चितने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.




