पुणे : देशातील सर्वांत मोठ्या व तितक्याच महत्त्वाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये मी अध्यक्ष असताना अनेक बदल घडवावे लागले. मात्र, जेव्हा या परीक्षेमध्ये नीतिशास्त्र या विषयाचा अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यावर चौफेर टीका झाली. तथापि, तत्कालीन सरकार व मंत्रालयाने आयोगावर ठाम विश्वास व्यक्त केल्याने या बदलांची प्रभावी अंमलबजावणी झाली. कालांतराने नीतिशास्त्राचे महत्त्व सर्वांना पटले, असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (युपीएससी) माजी अध्यक्ष डॉ. डी. पी. अग्रवाल यांनी व्यक्त केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथील स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (एसआयसीएस) तर्फे नागरी सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित “नागरी सेवा आणि राष्ट्रनिर्मिती” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. किशोर राजे निंबाळकर, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलपती डॉ. मोहित दुबे, स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे, स्कूल ऑफ लॉचे अधिष्ठाता डॉ. गोविंद राजपाल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. अग्रवाल म्हणाले की, नागरी सेवा परीक्षांमध्ये नीतिशास्त्राचा अंतर्भाव करण्यापूर्वी तो विषय माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था (आयआयटीएम), ग्वाल्हेर येथे समाविष्ट करण्यात आला होता. कोणालाही त्रास न देता गोष्टी प्रभावीपणे घडवून आणण्याचे कार्य नीतिशास्त्र करते. नीतिमूल्ये पाळल्यामुळे जगात शांतता प्रस्थापित होते. त्यामुळे देशाचा कणा असणाऱ्या भावी प्रशासकांमध्ये नीतिमूल्ये असायलाच हवीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, सर्वच जण सनदी अधिकारी होऊ शकत नाहीत; युपीएससी व एमपीएससी व्यतिरिक्तही समाजात विधायक बदल घडवून राष्ट्रनिर्मितीत हातभार लावता येतो, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की, भारताला विकसित करण्याची जबाबदारी केवळ सरकार किंवा अधिकाऱ्यांची नाही. प्रत्येक नागरिकाला नागरी जबाबदारीची जाणीव होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे व नियमांचे पालन करून काम केल्यास २०४७ पर्यंत भारत विकसित होऊन जगात महासत्ता बनेल. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात डॉ. पल्लवी दराडे (आयआरएस), प्रदीप कुमार यादव (आयपीएस) तसेच पुण्याच्या कर आयुक्त वैशाली पतेंगे (आयआरएस) यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोव्होस्ट डॉ. गणकर यांनी केले, तर आभार डॉ. धर्मपात्रे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी ‘लक्ष्य’ची स्थापना – या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरी सेवा तसेच राज्य सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लक्ष्य’ या क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून विद्यापीठातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही शाखेत शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एमआयटी-एसआयसीएस मधील प्राध्यापक व तज्ज्ञांकडून सातत्यपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.