UPSC Result: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला. राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील अनुज अग्निहोत्री यांनी ऑल इंडिया रँक १ पटकावत देशभरातील लाखो स्पर्धकांमध्ये बाजी मारली. AIIMS जोधपूरमधून MBBS पूर्ण केलेल्या या डॉक्टरने वैद्यकीय क्षेत्र सोडून नागरी सेवेत घेतलेल्या झेपाने अनेक युवा स्पर्धकांना प्रेरणा दिली आहे. अनुज अग्निहोत्री यांचा प्रेरणादायी प्रवास – UPSC Result अनुज अग्निहोत्री यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अॅटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या कोचिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कोटा शहरातील एम.बी. पब्लिक सीनियर सेकंडरी स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झाले. त्यांनी AIIMS जोधपूरमधून MBBS ची पदवी घेतली. निकाल जाहीर होण्यापूर्वी ते केंद्र सरकारच्या दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे नागरी सेवा (DANICS) मध्ये प्रोबेशनर म्हणून कार्यरत होते. टॉप ३ मध्ये कोण कोण? UPSC Result: अनुज अग्निहोत्री (AIR 1) यांच्यापाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरा, तर आकांश ढुल यांनी तिसरा क्रमांक मिळवला. टॉप २० उमेदवारांची यादी – UPSC Result १. अनुज अग्निहोत्री, २. राजेश्वरी सुवे एम, ३. आकांश ढुल, ४. राघव झुनझुनवाला, ५. ईशान भटनागर, ६. झिनिया अरोड़ा, ७. ए.आर. राजा मोहिद्दीन, ८. पक्षल सेक्रेटरी, ९. आस्था जैन, १०. उज्ज्वल प्रियांक, ११. यशस्वी राज वर्धन, १२. अक्षित भारद्वाज, १३. अनन्या शर्मा, १४. सुरभी यादव, १५. सिमरनदीप कौर, १६. मोनिका श्रीवास्तव, १७. चितवन जैन, १८. श्रुती आर, १९. निसार दिशांत अमृतलाल, २०. रवी राज. ९५८ उमेदवारांची शिफारस; IAS, IPS, IFS साठी निवड – या परीक्षेद्वारे एकूण ९५८ उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यापैकी सुमारे १८० उमेदवार IAS, १५० उमेदवार IPS तर ५५ उमेदवार IFS मध्ये रुजू होणार आहेत. परीक्षेचे तीन टप्पे – देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेचे तीन टप्पे असतात, पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा आणि मुलाखत. यंदाची पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी झाली. मुख्यपरीक्षा २२ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान घेण्यात आली. त्यानंतर एकूण २,७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले. मुलाखत प्रक्रिया ५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडली. निकाल कसा पाहाल? उमेदवार upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन UPSC Civil Services Final Result 2025 च्या लिंकवर क्लिक करून मेरिट यादीची PDF डाउनलोड करू शकतात. रोल नंबरच्या साहाय्याने आपले नाव व क्रमांक तपासता येईल. UPSC ने सांगितले की अंतिम निकालानंतर सुमारे १५ दिवसांच्या आत सर्व उमेदवारांचे गुण अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.