पुणे – सारे शहर होर्डिंगनी गजबजून गेलेले असताना अनेक क्षेत्रीय कार्यालयांनी आपल्या परिसरात एकही अनधिकृत होर्डिंग नसल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे या अहवालाची शहानिशा करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या दोन पथकांकडून मागील आठवड्यापासून तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत १५ मधील ३ क्षेत्रीय कार्यालयांच्या तपासणीत तब्बल ४१ अनधिकृत होर्डींग आढळून आली आहेत. तर उर्वरित क्षेत्रीय कार्यलयांच्या तपासणीत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना खोटा अहवाल देणारे अधिकारी चांगलीच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. शहरात अनेक चौकांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) धोकादायक स्वरूपात पुणेकरांच्या डोक्यांवर यमदूतासारखे उभे आहेत. यंदा पावसाळ्यात तीन ठिकाणी होर्डिंग पडली आहेत. शहरात महापालिकेने मान्यता दिलेले २६४० अधिकृत होर्डिंग आहेत. या वर्षी शहरात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातल्याने पालिकेने पावसाळ्यातील खरबदारीच्या अनुषंगाने तातडीने अनधिकृत होर्डिंग काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. त्यानंतर १४ क्षेत्रीय कार्यालयांनी दिलेल्या अहवालात शहरात केवळ २४ अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तत्काळ ती तातडीनं काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने २२ होर्डिंग काढले असून, दोन होर्डिंगबाबत वाद सुरू आहे. त्यानंतरही अनधिकृत होर्डिंगला अधिकारीच आर्थिक देवणा-घेवाणीतून पाठबळ देत असल्याने आयुक्तांकडून अशा अनधिकृत होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मागील आठवड्यात ६ जूनपासून ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने मान्यता दिलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ही तपासणी केली जात असून, आतापर्यंत १५ मधील ३ क्षेत्रीय कार्यालयात जवळपास ४१ अनधिकृत होर्डिंग आढळून आले आहेत. तर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष पालिकेचे होर्डिंग शुल्क अधिक असल्याने अनेक व्यावसायिकांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना व आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभारली आहेत. विशेषतः नव्याने समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत अवकाळी पाऊस तसेच पूर्वमोसमी पावसामुळे होर्डिंग पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यानंतरही अशा प्रकारे होर्डींग उभे राहत असल्याने आता महापालिका आयुक्त काय भूमिका घेणार याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.