PUNE : 23 गावांतील आणखी 37 कर्मचारी पालिकेच्या सेवेत

पुणे – महापालिकेत 30 जून 2021 मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील आणखी 37 कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार, महापालिकेकडून 445 कर्मचारी समाविष्ट करून घेतले जाणार होते.
मात्र, सुमारे 44 कर्मचाऱ्यांच्या पदनामात गोंधळ असल्याने त्यांना महापालिका सेवेत घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे सुरुवातीला केवळ 401 कर्मचाऱ्यांचा महापालिका सेवेत समावेश करत त्यांना पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात येत आहे.
तर, उर्वरित 44 कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीनुसारच वेतन देण्यात येत होते. अखेर, प्रशासनाने या उर्वरित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आणखी 37 कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांचे पदनाम निश्चित करून त्यांचा दि. 1 नोव्हेंबरपासून पालिकेच्या आस्थापनेवर समावेश केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना महापालिकेप्रमाणेच वेतन मिळण्याचा मार्ग उशिरा का होईना पण, मोकळा झाला आहे.
उर्वरित सात कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची अद्यापही छाननी सुरू असल्याचे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. छाननीचे काम झाल्यानंतर याबाबत महापालिका प्रशासन निर्णय घेऊन त्यांनाही सेवेत समावून घेणार आहे.
कागदपत्रांची छाननी सुरू…
समाविष्ट गावांमधील सेवा नाकारलेल्या कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून कागदपत्र संकलित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, महापालिका तसेच जिल्हा परिषदेची संयुक्त समिती असल्यानेही समितीच याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र, त्याच वेळी ही समिती या पूर्वी विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या निकषावरच या उर्वरित कर्मचाऱ्यांची कागदपत्रांची तपासणी विभागीय आयुक्तांच्या समिती समोर सादर कागदपत्रांव्यतिरिक्त इतर कागदपत्रे उमेदवार देऊ शकला तरच त्याच्याबाबत विचार केला जाणार असल्याचे प्रशासकीय पातळीवर सांगण्यात येत आहे. मात्र, ही कागदपत्रे संकलित करण्यात आल्याने महापालिकेत नोकरी लावून देतो, असे सांगून या कर्मचाऱ्यांची फसवणूक केली जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय मुद्दे
- कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर निर्णय
- दि. 1 नोव्हेंबरपासून आस्थापनेवर समावेश
- पदनामातील गोंधळामुळे उशिरा समावेश





