पुणे : पीएमपीकडून 271 जादा बसेस

पुणे – राज्यभरातून एक जानेवारी रोजी कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभाला मानवंदा देण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. या नागरिकांच्या सोयीसाठी, वाढीव प्रवासी संख्या विचारात पीएमपीने 1 जानेवारी रोजी पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोफत आणि प्रवासी भाड्यासह अशा तब्बल 271 ज्यादा सेसचे नियोजन करण्यात आले आहे.
या बसेस 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत नियोजित मार्गांवर धावतील.
याबाबत पीएमपीएमएल ने दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 06.00 वाजेपर्यंत तुळापूर फाटा / लोणीकंद कुस्ती मैदान – 30 बसेस, वढू फाटा ते वढू करिता – 5 बसेस, तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भिमा कोरेगांवपर्यंत – 25 बसेस अशा एकूण 60 मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच 1 जानेवारी रोजी तुळापूर फाटा / लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोल नाका पर्यंत 100 बसेस, शिक्रापूर रोड (तोरणा हॉटेल) ते भिमा कोरेगांव पर्यंत 75 बसेस व वढू फाटा ते वढू पर्यंत 25 बसेस अशा एकूण 200 मोफत (विनातिकिट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 6 बसस्थानकांवरून नियमित मार्गाच्या 36 व जादा 35 अशा एकूण 71 जादा बसेसचे प्रवास भाडे आकारणी करून नियोजन करण्यात आले आहे.





