Pune : बाजार समितीचे ११ संचालक गोव्यात; सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात

पुणे – पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिला आहे. आता १८ जुलै रोजी नवीन सभापतीची निवड केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडी घडत आहेत. सभापतिपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. संचालकांचा एक गट सहलीसाठी देवदर्शन करून गोव्याला रवाना झाला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत चुरस पाहायला मिळणार आहे.
२० वर्षांच्या प्रशासकीय राज्यानंतर २५ महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा पराभव करून सर्वपक्षीय पॅनेल विजयी झाले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाचेच दिलीप काळभोर सभापती बनले होते. उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. आता बाजार समितीवर सभापती भाजपचा होणार का राष्ट्रवादीचा, याकडे हवेली तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
काळभोर यांच्यावर सभापतीच्या काळात अविश्वासाचा ठराव आणला होता. त्या वेळी एक गट दुबईला गेला होता. त्यानंतर अविश्वास ठराव फेटाळला. आता एक गट गोव्याला गेला आहे. त्यामुळे या सहलीला राजकीय महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद हे सभापतिपदासाठी जे नाव निश्चित करतील, तोच सभापती असेल, असेही सांगण्यात येत आहे





