Pulse Polio Campaign: पुण्यात २ लाख ७४ हजार बालकांना पोलिओ डोस! पण ‘या’ वयोगटातील मुलांचे काय? वाचा
Pulse Polio Campaign: पुणे महापालिका हद्दीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात; १ हजार १८२ बूथच्या माध्यमातून २ लाख ७४ हजार बालकांचे लसीकरण.

Pulse Polio Campaign – पुणे महापालिका हद्दीत रविवारी (दि. २८) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात राबविण्यात आली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण झाले. १ हजार १८२ पोलिओ बूथच्या माध्यमातून ० ते ५ वयोगटांतील ३ लाख ८ हजार ६५६ बालकांच्या उद्दिष्टांपैकी दोन लाख ७४ हजार ५४९ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. हद्दीत एकूण ८८.९५ टक्के इतके लसीकरण झाले.
नारायण पेठ येथील मुख्य लसीकरण केंद्रावर जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे यांच्या हस्ते ० ते ५ वयोगटांतील बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शांताबाई खडसरे दवाखान्यास भेट दिली. नगर रोड व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील केंद्रांना आरोग्य सेवा विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रवासात असलेल्या बालकांपर्यंत पोलिओ लस पोहोचविण्यासाठी बसस्थानके,
एसटी स्थानके, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि उद्यानांमध्ये ८४ ट्रान्झिट टीम आणि ४२ मोबाइल टीम कार्यरत होत्या. या टीमच्या माध्यमातून २२ हजार ४२३ लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यात आला. राज्य शासनाकडून पुणे महापालिकेला ४ लाख २० हजार ७२० पोलिओ डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी २ लाख ८७ हजार १८७ डोस वापरण्यात आले. एकूण २ लाख ७४ हजार ५४९ बालके आणि ५ वर्षांवरील ६ हजार ८०२ लाभार्थ्यांना डोस देण्यात आले. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
विशेष घरभेट मोहीम
रविवारी पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी पुढील पाच दिवस विशेष घरभेट मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ६५५ जणांची टीम आणि ३२९ पर्यवेक्षक कार्यरत राहणार आहेत, तसेच महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्येही पुढील पाच दिवस पोलिओ डोस उपलब्ध राहणार आहेत.





