पुरंदर उपसा याजनेचे पाणी द्या

दौंडच्या दक्षिण पट्ट्यातील शेतकऱ्यांची मागणी; अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

दौंड- दौंड तालुक्‍याकरीता खडकवासलातून येणारे एक आवर्तन यावर्षी कमी करण्यात आले यामुळे तालुक्‍यातील शेतीकरीता अन्य योजनांचे पाणी मिळणे गरजेचे असताना दक्षिण पट्ट्यातील गावांना पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

जिल्ह्यात यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला असला तरी दौंड तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. जिरायती पट्ट्यात तर आजही दुष्काळजन्य स्थिती आहे. धरणांतून भीमा नदीत विसर्ग येत असल्याने नदीकाठावरील गावांना याचा फायदा होत असला तरी तालुक्‍याच्या दक्षिण पट्ट्यातील गावांतील पाणी योजना तसेच शेतीकरीता खडकवासलासह अन्य योजनांतून पाणी मिळणे गरजेचे ठरत आहे. यामुळेच पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याची मागणी होऊ लागली आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत दौंडच्या दक्षिणेकडील अवर्षण प्रवण क्षेत्रातील 6800 हेक्‍टर क्षेत्र कुपटेवाडी फाट्याद्वारे ओलिताखाली येईल, असे आश्‍वासन योजना सुरू झाली त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात योजना सुरू होऊन अनेक वर्षे झाली तरी या योजनेच्या पाण्याचा लाभ दौंड तालुक्‍यातील गावांना झालेला नाही. कुपटेवाडी फाट्यास पाणी सोडण्याचे प्रयोजन योजनेत असताना संबंधीत अधिकाऱ्यांकडून मात्र, तालुक्‍यातील गावांना नेहमीच दुर्लक्षीत ठेवले जात आहे. योजनेचे पाणी आल्यास कुपटेवाडी फाटा लाभ क्षेत्रातील डाळिंब, बोरीऐंदी, ताम्हणवाडी, भरतगाव, कुपटेवाडी, यवत, भांडगाव परिसराला मोठा फायदा होऊ शकतो. येथील शेतकऱ्यांच्या कृतीसमितीने पाठपुरावा केला की फाट्यास तात्पुरते पाणी सोडले जाते नंतर ते बंद केले जाते. फाटा लाभ क्षेत्रातील गावांमध्ये मार्च-एप्रिलपासून पाण्याची टंचाई आहे. या फाट्यास सातत्याने पाणी आल्यास डाळिंब-बोरीऐंदी ताम्हणवाडी आणि भरतगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायम सुटू शकेल, त्यामुळे याकामी लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणे गरजेचे आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

  • … कोरडी आश्‍वासनं
    कुपटेवाडी फाट्यास सातत्याने सलग आणि विनाखंडीत भांडगावपर्यंत पाणी सोडण्यात येईल, असे आश्‍वासन पुरंदर उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांकडून दिले जाते. परंतु, याकडे दुर्लक्ष होते. या योजनेचे पाणी किमान 15 दिवस तरी सोडले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. पुरंदर उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांनी न्याय्य भावनेने किमान कपटेवाडी फाट्यास तरी पाणी सोडण्याची तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • दौंड तालुक्‍यातील दक्षिण पट्ट्यातील गावांना पुरंदर उपसाचे पाणी मिळावे, याबाबत पाणी नियोजन बैठकीवेळीच संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या गांभीर्यपूर्वक सोडविल्या जातील. याबाबत अधिक माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करू.
    – राहूल कुल, आमदार, दौंड
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×