Nagar | शासकीय इमारतीमध्ये दिव्यांगांना सुविधा उपलब्ध करून देऊ

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय इमारतीची माहिती घेण्यात येईल, त्यानुसार ज्या ठिकाणी लिफ्टची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अथवा तळमजल्यावर कार्यालय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. याबाबत लवकरच प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिले.
दिव्यांग व्यक्तींना निवडणूक कालावधीत व इतर कार्यालयीन कामकाज करण्यासाठी दिव्यांग कायदा अधिनियम 2016 नुसार विनाअडथळा सुलभतेने ये-जा करण्यासाठी लिफ्ट अथवा तळमजल्यावर कार्यालय असणे आवश्यक आहे.
त्याची पूर्तता जिल्ह्यात प्रत्येक शासकीय इमारतीमध्ये होणे आवश्यक आहे, अशी मागणी दिव्यांग विभाग नोडल अधिकारी व अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित निवडणूक चर्चा कार्यक्रमात केली होती.





