पुणे जिल्हा : कोणी सुविधा देता का सुविधा?

आळंदी पीएमपीएमएल बस स्थानकात प्रवाशांसह कर्मचार्यांची आर्तहाक
स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था : स्थानकात पडले खड्डे
आळंदी – संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे तीर्थक्षेत्र आळंदी येथे नियमित हजारो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वगळता येथे पीएमपीएमएलची सेवा ही गेली 30 वर्षांपासून अहोरात्र सुरू आहे; मात्र या स्थानकावर आजवर कर्मचार्यासह प्रवाशांसाठी सुविधेच्या नावाने कायमच बोंबच आहे.
येथील बस स्थानकावर प्रवाशांसाठी स्वच्छतागृह असून नसल्यासारखे आहे त्याची दुरवस्था उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही. विशेषतः स्वच्छातागृहाअभावी महिलांची फार मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. येथील पीएमपीएमएल कमर्र्चार्यांना देखील स्वच्छतागृहासाठी बस स्थानकावरून दूरच्या अंतरावर जावे लागते. त्याचबरोबर येथील स्थानकावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रवाशांना पुरेशा प्रमाणात निवारा शेड नाही.
दुरवस्था डोळ्यांनी पाहवत नाही
या बस स्थानकावरून रोज लाखो भाविक पीएमपीएमएलने प्रवास करीत असून दररोज 75 लाख रुपये इन्कम (नफा) असणार्या बस स्थानकाची अशी ही दूर अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही. याकडे पीएमपीएल प्रशासन मात्र जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तरी या ठिकाणी असणार्या सर्व गैरसोयी दूर कराव्यात; अन्यथा यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
या शौचालयासाठी 75 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून सध्या आचारसंहिता असल्याने टेंडर काढण्यास अडचणीत येत आहेत तरी येत्या 15 ऑगस्टपर्यंत शौचालयाचे आधुनिक पद्धतीने बांधकाम करून ते प्रवासी नागरिक यांना खुले करून देण्यात येईल.
– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, नगरपालिका, आळंदी





