पहिल्या महिला भारतीय : बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा
बारामती – अमेरिकेतील लासव्हेगास येथे होणाऱ्या अमेरिकन सोसायटी फॉर मेटॅबोलिक अँड बेरीयाट्रिक सर्जरीज या जगातील सर्वोच्च संस्थेच्या वार्षिक परिषदेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी बारामतीच्या राधिका मिलिंद शहा (वाघोलीकर) यांची निवड झाली आहे.
नामांकित संस्थेच्या परिषदेमध्ये जगभरातील डॉक्टर व डायटेशनांना प्रशिक्षण देण्यासाठी निवड होणारी राधिका शहा या पहिल्या महिला भारतीय डायटिशियन ठरल्या आहेत. राधिका यांनी जिद्द, चिकाटी, सातत्य, परिश्रम, बुद्धीमत्तेच्या जोरावर हा बहुमान मिळविला आहे. त्यांचे बारामती शहरासह तालुक्यातून कौतुक होत आहे.
जगभरातील नामांकित सर्जन व डायटीशियन्स यांना राधिका या परिषदेत प्रशिक्षण देणार आहे. दरवर्षी निवडक व संशोधन करणाऱ्या व्यक्तींना ही संधी मिळते. (दि.25) रोजी राधिका या अमेरिकेला रवाना होत आहेत. यंदा बारामतीच्या राधिका यांनी हा सन्मान प्राप्त करीत बारामतीच्या नावलौकीकात भर घातली आहे.
येत्या ऑगस्टमध्ये इटलीतील नेपल्स येथे होणाऱ्या इंटिग्रेटेड फेडरेशन फॉर सर्जरी ऑफ ओबेसिटी अँड मेटॅबोलिक डिस ऑर्डर परिषदेमध्ये अनुभवी आहार तज्ज्ञ म्हणून त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले आहे. तिने पाठविलेला शोधनिबंध हा जगातील सर्वोच्च पहिल्या शोधनिबंधात निवडला आहे. राधिका या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार आहेत.
यापूर्वी त्यांनी मलेशिया, बेल्जियम, इंग्लंड, फिलिपाईन्स तसेच भारतामधील सर्व अग्रगण्य परिषदांमध्ये भाग घेऊन आपला ठसा उमटविला आहे. ओबेसिटी म्हणजेच स्थूलत्व या विषयावर राधिका पुण्यातील नामांकित तज्ज्ञ डॉ. शशांक शहा यांच्यासमवेत काम करीत आहेत. त्यांच्या अनेक शोधनिबंधांना जागतिकस्तरावर सन्मानित केले आहे.
अतिस्थूल व्यक्तींबाबत मार्गदर्शन करणार
कोविडच्या काळात देखील आहार कसा असायला हवा होता, याबाबत त्यांनी राज्यस्तरावर काम केले आहे. ओबेसिटी (स्थूलत्व) न्युट्रिशियनिस्ट ही नवीन संकल्पना गेल्या दहा वर्षात रुढ झाली आहे. राधिका शहा यांनी आठ वर्षांत देश व परदेशात विविध ठिकाणी काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करुनच अमेरिकेत त्यांना प्रशिक्षणाचा सन्मान दिला आहे. अतिस्थूल व्यक्तींना कसे मार्गदर्शन करायचे, आहाराचे नियोजन कसे करायचे याचे मार्गदर्शन राधिका शहा या अमेरिकेत करणार आहेत.