बदलापूरचे आंदोलन हे ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी; ‘या’ भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

बदलापूर : बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळपासून रेल्वे स्थानकावर बदलापूरसह अनेक भागातील लोकांनी रेल्वे रोको केला आहे. पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आंदोलक रेल्वे स्थानकावरुन हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. यादरम्यान या प्रकरणावर भाजप आमदार किसन कथोरे यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले भाजप आमदार किसन कथोरे?
सकाळी आंदोलन भरटकलं. शाळा बाजूला राहिली आणि रेल्वेमध्ये घुसले. रेल्वेमध्ये घुसलेले आरोपी बदलापूरचे राहिवासी नाहीत. सगळी बाहेरुन आलेली मंडळी आहे. शाळेतील वातावरण आता शांत झालं आहे. शाळेतील मुख्याध्यापकावर कारवाई झाली. कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. संस्थाचालकांची चौकशी सुरु केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी आहे.
बदलापूरकरांना आज वेठीस धरण्यात आलं आहे. हे योग्य नाही. सर्वांना माझी विनंती आहे, शांतता राखावी. या प्रकरणाचे कोणीही राजकारण करु नये. स्वत: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आदेश दिले असतील. नागरिकांनी संयम पाळला होता. बाहेरुन आलेल्या मंडळींनी रात्रीत बॅनर तयार केले आणि बदलापूरमध्ये लागले. लाडकी बहीणचं मानधन देऊ नये, आम्हाला न्याय द्यावा. हे बॅनर उल्हासनगर वगैरे भागातून आले. हे कोणीतरी ठरवून केले आहे असे आमदार किसन कथोरे म्हणाले आहेत.
या प्रकरणाची राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतली दखल
राष्ट्रीय बालहक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी म्हटलं की, आम्ही स्वतः टीम पाठवणार आहोत. काही पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने हटवलं आहे, हे स्वागत योग्य आहे. ज्यांनी हलगर्जी केली असेल त्यांच्याविरोधात पॉक्सो कलम १९ खाली FIR दखल केला जाईल. बदलापूरला आम्ही टीम पाठवणार आहोत. केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत की पोक्सो प्रकरणात झिरो टॉलरन्स आहे. त्यामुळे जो दोषी आढळेल त्यावर कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली दखल
बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. तर शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.





